Australian Open Badminton 2026: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध क्वेसेंटर (Quaycentre) मैदानावर सुरू असलेल्या प्रतिष्ठित साथिओ ग्रुप ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन २०२६ (BWF सुपर ५००) स्पर्धेत भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) हिनं आपलं उत्कृष्ट कौशल्य दाखवत उपांत्य फेरीत (Semifinals) प्रवेश केला आहे. आज शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी खेळवल्या गेलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व (Quarterfinals) फेरीच्या एकतर्फी सामन्यात सिंधूनं चायनीज तैपेईच्या चेन सु-यु (Chen Su-yu) हिचा पराभव करत जेतेपदाच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
अवघ्या २७ मिनिटांत मिळवला दणदणीत विजयजागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या तिसऱ्या मानांकित पी. व्ही. सिंधूनं या उपांत्यपूर्व लढतीत सुरुवातीपासूनच कोर्टवर आपलं संपूर्ण वर्चस्व राखलं. तिनं चायनीज तैपेईच्या चेन सु-युविरुद्ध अवघ्या २७ मिनिटांत २१-६, २१-९ अशा सरळ गेम्समध्ये एकतर्फी विजय मिळवला. सिंधूनं तिच्या भेदक आणि आक्रमक स्मॅशेसच्या जोरावर प्रतिस्पर्धी खेळाडूला सामन्यात डोकं वर काढण्याची एकही संधी दिली नाही. याआधी गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत (Round of 16) सिंधूने भारताच्याच इशाराणी बरुआचा २२-२०, २१-१२ असा पराभव केला होता.
या शानदार विजयानंतर पी. व्ही. सिंधूचा पुढील उपांत्य फेरीचा (Semifinal) सामना उद्या (शनिवार, १३ जून) रंगणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी सिंधूचा सामना जपानच्या अव्वल मानांकित अकानं यामागुची विरुद्ध होईल, जिनं तन्वी शर्माला हरवून सेमीफायनल गाठली आहे. सिंधू आणि यामागुची यांच्यात आतापर्यंत झालेल्या २८ सामन्यांपैकी १५ सामने सिंधूनं जिंकले असून उद्याचा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे

