Australian Open Badminton 2026: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध ‘क्वेसेंटर’ (Quaycentre) मैदानावर सुरू असलेल्या प्रतिष्ठित साथिओ ग्रुप ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन २०२६ (BWF सुपर ५००) स्पर्धेत भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिनं शानदार विजयी सलामी दिली आहे. आज (बुधवार, १० जून) पार पडलेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या (Round of 32) एकतर्फी सामन्यात सिंधूनं पेरूच्या इनेज कॅस्टिलोचा अवघ्या २९ मिनिटांत पराभव केला.
या सामन्यात सिंधूनं सुरुवातीपासूनच कोर्टवर आपलं पूर्ण वर्चस्व राखलं. तिच्या वेगवान ड्रॉप शॉट्स आणि अचूक स्मॅशेससमोर पेरूच्या खेळाडूला कोणतीही संधी मिळाली नाही. सिंधूनं इनेज कॅस्टिलोचा (Inés Castillo) २१-१३, २१-११ असा अवघ्या २९ मिनिटांत सरळ गेम्समध्ये पराभव केला करून पुढच्या फेरीत दाखल झाली आहे. सिंधूचा पुढील दुसऱ्या फेरीचा (Round of 16) सामना उद्या गुरुवार, ११ जून २०२६ रोजी भारताच्याच उदयोन्मुख खेळाडू इशाराणी बरुआ विरुद्ध खेळवला जाणार आहे. इशाराणीनं आज पहिल्या फेरीत चीनच्या हान कियान शीचा २२-२०, १०-२१, २१-१४ असा ३ गेम्सच्या थरारात पराभव केला आहे.
इतर भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी
आजचा दिवस भारतासाठी अत्यंत यशस्वी ठरला. महिला एकेरीच्या इतर सामन्यांमध्ये भारताच्या मालविका बन्सोडनं थायलंडच्या टॉनरग साहेनचा १५-२१, २१-७, २१-१३ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीमध्ये एम. आर. अर्जुन आणि हरीहरन अमशकारुणन या जोडीनं अमेरिकेच्या आर्डेन ली आणि स्टॅन्ली झिंग जोडीवर २१-१३, २१-१३ असा सहज विजय मिळवला. तसेच पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवणाऱ्या सनीत दयानंदने पुरुष एकेरीत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
आणखी हेही वाचा
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पी. व्ही. सिंधूकडे भारताचे नेतृत्व, तर अनेक स्टार्सची माघार-https://agcsport.tv/other/p-v-sindhu-leads-india-in-australian-open-while-many-stars-withdraw/

