Canadian Grand Prix 2026: कॅनडातील माँट्रियल येथील प्रसिद्ध सर्किट जाइल्स व्हिल्न्युव्ह मैदानावर आज 25 मे 2026 रोजी पार पडलेली ‘कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2026’ फॉर्म्युला वन शर्यत मर्सिडीजच्या अँड्रिया किमी अँटोनेलीनं (Andrea Kimi Antonelli) जिंकून नवा इतिहास रचला आहे. चालू 2026 च्या एफ-1 (F1) हंगामातील ही पाचवी ग्रँड प्रिक्स शर्यत होती, ज्यामध्ये मर्सिडीज आणि फेरारीच्या ड्रायव्हर्सनी पोडियमवर कब्जा केला. या थरारक शर्यतीत मर्सिडीजचा 19 वर्षीय किमी आंतोनेली पहिल्या, फेरारीचा लुईस हॅमिल्टन दुसऱ्या, तर रेड बुलचा माजी विजेता मॅक्स व्हर्स्टॅपेन तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
शर्यतीची सुरुवात पोल पोझिशन मिळवणाऱ्या मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलनं (George Russell) दमदार केली होती. रसेल आणि किमी अँटोनेली यांच्यात सुरुवातीच्या लॅप्समध्ये अव्वल स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र, 30 व्या लॅपवर जॉर्ज रसेलच्या कारमध्ये अचानक इलेक्ट्रिकल बिघाड झाल्यामुळे त्याला शर्यतीतून दुर्दैवी माघार घ्यावी लागली. रसेल बाहेर पडताच किमी अँटोनेलीनं शर्यतीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं. त्यानं फेरारीच्या लुईस हॅमिल्टनपेक्षा 10.7 सेकंदांची मोठी आघाडी घेत फिनिशिंग लाईन पार केली. फेरारीच्या लुईस हॅमिल्टननं उत्कृष्ट कौशल्य दाखवत मॅक्स व्हर्स्टॅपेनला मागं टाकून दुसरं स्थान पटकावलं, तर मॅकलारेनचा लँडो नॉरिस देखील गिअरबॉक्सच्या समस्येमुळे शर्यतीतून बाद झाला.
किमी अँटोनेलीनं चालू वर्षात कितीवेळा जिंकला ही स्पर्धा
या शानदार विजयासह मर्सिडीजच्या किमी अँटोनेलीनं चालू 2026 च्या हंगामात सलग चौथी ग्रँड प्रिक्स जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. यापूर्वी त्यानं सलग चायनीज, जपानी आणि मायामी ग्रँड प्रिक्सवर आपलं नाव कोरलं होतं. या विजयामुळे किमी किमी अँटोनेलीचं आता जागतिक ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप गुणतालिकेत एकूण 131 पॉईंट्स (गुण) झाले असून त्यानं 43 गुणांची मजबूत आघाडी घेतली आहे.
कॅनडाचा हा रोमांचक थरार संपल्यानंतर आता फॉर्म्युला वनचा पुढची स्पर्धा 7 जून 2026 रोजी प्रतिष्ठित मोनाको ग्रँड प्रिक्स शर्यतीत रंगणार आहे.

