ISSF Junior World Cup 2026: इजिप्तच्या कैरो शहरात 18 एप्रिलपासून सुरू असलेल्या ‘ISSF ज्युनिअर वर्ल्डकप 2026’ मध्ये भारतीय युवा नेमबाजांनी आपल्या अचूक वेधानं जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा उंचावला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच भारतानं 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा एकूण 7 पदकांची कमाई केली असून पदकतालिकेत आपलं स्थान भक्कम केलं आहे.
या स्पर्धेतील भारताचं पहिलं सुवर्णपदक शिवा नरवाल यानं मिळवून दिलं. त्यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात जागतिक दर्जाच्या नेमबाजांना मागं टाकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. महिला विभागात सेजल कांबळे हिनं 25 मीटर पिस्तूल प्रकारात, तर पनाह भुग्रा हिनं 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकून भारताच्या खात्यात मोलाची भर घातली. तसेच, पुरुषांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात राज चंद्रा आणि 50 मीटर रायफल प्रोनमध्ये रोहित कन्याण यांनी रौप्य पदके पटकावली आहेत.
पिस्तूल प्रकारात भारताचं वर्चस्व दिसून आलं असून, 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये चिराग शर्मा आणि 25 मीटर पिस्तूल प्रकारात अभिनव देशवाल यांनी कांस्य पदके जिंकली आहेत. 71 सदस्यीय भारतीय पथकाकडून या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा असून उर्वरित पाच दिवसांत पदकांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
कैरो येथे 27 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील 35 देशांतील 284 हून अधिक अव्वल युवा नेमबाज सहभागी झाले आहेत. भारतानं जागतिक स्तरावर सर्वाधिक खेळाडूंचं पथक पाठवून आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत भारतानं 37 पदकांसह जेतेपद पटकावलं होतं, तोच इतिहास यंदाही कैरोच्या भूमीवर पुनरावृत्त होण्यासाठी भारतीय युवा सज्ज झाले आहेत.
येत्या काही दिवसांत होणाऱ्या मिक्सड टीम (मिश्र संघ) इव्हेंटमध्ये भारताला आणखी किती पदके मिळतील, याकडे आता क्रीडा विश्वाचं आणि चाहत्यांच लक्ष लागलं आहे.
आणखी हेही वाचा
धोनी खेळणार आजचा सामना?-https://agcsport.tv/?p=1626&preview=true&_thumbnail_id=1628

