IND vs AFG ODI: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (HPCA) मैदानावर काल १३ जून २०२६ रोजी खेळवल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय (ODI) सामन्यात भारतीय संघानं अफगाणिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. कर्णधार शुभमन गिलच्या नाबाद वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हा सामना अगदी एकतर्फी जिंकला. या शानदार विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
मुसळधार पावसामुळे सामन्यात उशीर
धर्मशाळाच्या बदलत्या हवामानामुळे दुपारपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता, ज्यामुळे खेळपट्टी झाकून ठेवावी लागली आणि नाणेफेकीला (Toss) मोठा उशीर झाला. खेळपट्टी सुकल्यानंतर पंचांनी प्रत्येकी ५० षटकांचा हा सामना २५-२५ षटकांचा करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिलनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे अफगाणिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली.
गुरबाझचे वादळी शतक
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. मात्र, सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाझनं एकाकी झुंज देत अवघ्या ५१ चेंडूंत ८ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीनं १०२ धावांचं आक्रमक शतक ठोकलं. मात्र, भारताच्या गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी ३ बळी घेत अफगाणिस्तानला २४.५ षटकांत १९४ धावांवर रोखलं.
कर्णधार गिलची आक्रमक खेळी
दुसऱ्या डावात १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा फलंदाज स्टार फलंदाज रोहित शर्मा अवघ्या १६ धावांवर धावबाद झाला. पण त्यानंतर सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला, जेव्हा कर्णधार शुभमन गिलनं ४८ चेंडूंत नाबाद ८४ धावांची कर्णधारी खेळी साकारली. गिलला साथ देण्यासाठी आलेल्या इशान किशननं ३४ धावाची महत्त्वाची खेळी केली. भारतानं २२.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा करत सामना अगदी सहज खिशात घातला.
हेड टू हेड
भारत आणि अफगाणिस्थान यांच्यात आतापर्यंत एकदिवसीय ५ सामने झाले आहेत. तर त्यातल्या ४ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे आणि उर्वरित राहिलेला १ सामना हा अनिर्णीत राहिला आहे. या रेकॉर्डवरून हे दिसत आहे की, भारताचा अफगाणिस्थानवर नेहमीच दबदबा राहिला आहे.
या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आता बुधवार, १७ जून २०२६ रोजी लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर खेळवला जाईल.

