Miami Open 2026: जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानाचा आणि इटलीचा स्टार खेळाडू जॅनिक सिनर (Jannik Sinner) सध्या टेनिस जगतात एकामागोमाग एक विक्रम प्रस्थापित करत आहे. मायामी ओपन 2026 च्या स्पर्धेत चौथ्या फेरीत त्यानं ॲलेक्स मिशेलसनविरुद्ध विजय मिळवला आहे. या विजयानं त्यानं उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-finals) धडक मारली आहे. तसेच त्यानं (सिनर) स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये स्थान पक्कं केलं आहे. या विजयामुळे सिनरनं फक्त पुढची फेरीच गाठली नाही, तर टेनिस इतिहासातील एक मोठा पराक्रम आपल्या नावी केला आहे.
कसा मिळवला विजय
मायामी ओपण स्पर्धेत सिनरनं अमेरिकेच्या उदयोन्मुख ॲलेक्स मिशेलसनला पराभूत केलं. पहिल्या सेटमध्ये सिनरनं 7-5 अशी बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये तो 2-5 अशा पिछाडीवर होता, मात्र तिथून त्यानं आपल्या अनुभवाच्या जोरावर जबरदस्त पुनरागमन केलं आणि सामना टायब्रेकमध्ये नेला. तो सामना त्यानं सेट 7-6 असा खिशात घातला.
सामन्यानंतर बोलताना सिनर म्हणाला, “आजची परिस्थिती कालच्या तुलनेत वेगळी होती, त्यामुळे मी ज्या प्रकारे लढा दिला त्याचा मला आनंद आहे. ॲलेक्स हा एक कठीण प्रतिस्पर्धी आहे. जर मला या स्पर्धेत पुढे जायचं असेल, तर मला बेसलाईनवरून आणखी सुधारणा करावी लागेल”.
सिनरने काय विक्रम केले?
या विजयामुळे सिनरनं नोव्हाक जोकोविचचा (Novak Djokovic) 10 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांमध्ये सलग सर्वाधिक सेट जिंकण्याचा विक्रम आता सिनरच्या नावावर झाला आहे. त्यानं आतापर्यंत सलग 28 सेट जिंकले असून, जोकोविचचा सलग 24 सेट जिंकण्याचा विक्रम त्यानं मागं टाकला आहे.
मागील कामगिरी
याच महिन्यात त्यानं इंडियन वेल्स 2026 (Indian Wells) चे विजेतेपद पटकावलं आहे. जर त्यानं मायामी ओपन ही स्पर्धा जिंकली, तर 2017 मध्ये रॉजर फेडररनं केलेल्या ‘सनशाईन डबल’ (Sunshine Double) विक्रमाची तो बरोबरी करेल.

