पूजा सिंगचा ऐतिहासिक पराक्रम; उंच उडीत मोडला १४ वर्षे जुना वरिष्ठ राष्ट्रीय विक्रम

Asian U20 Athletics Championships: आशियाई अंडर-20 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ही 22वी आवृत्तीची स्पर्धा 28 मे ते 31 मे 2026 दरम्यान हाँगकाँग येथे आयोजित करण्यात आली आहे. या 4 दिवसीय प्रतिष्ठेच्या खंडीय स्पर्धेत 48 सदस्यीय भारतीय तुकडी (30 पुरुष आणि 18 महिला) आशियातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलीट्सविरुद्ध आपले आव्हान सादर करत आहे. या स्पर्धेत पूजा सिंह (Pooja Singh) हिने उंच उडीत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच अनेक भारतीय खेळाडूंनीही सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

पूजा सिंग हिने कोणता विक्रम केला?
हरियाणातून आलेल्या 19 वर्षीय पूजा सिंगनं शुक्रवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 1.93 मीटरची ऐतिहासिक उंच उडी मारली. या ऐतिहासिक उडीसह तिनं फक्त सुवर्णपदकावरच नाव कोरलं नाही, तर सहना कुमारीचा 2012 मधील 14 वर्षे जुना 1.93 मीटरचा वरिष्ठ राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. पूजानं प्रथम 1.91 मीटर पार करून तिचा स्वतःचा ज्युनियर राष्ट्रीय विक्रम सुधारला आणि त्यानंतरच्याच प्रयत्नात 1.93 मीटरची सर्वोच्च उंची गाठून ती भारताची सर्वकालीन नंबर-1 महिला हाय जम्पर बनली. या कामगिरीमुळे तिनं आगामी कॉमनवेल्थ गेम्स 2026 चा पात्रता निकषही (1.92 मीटर) ओलांडला आहे.

इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि राष्ट्रीय विक्रम
पूजा सिंगव्यतिरिक्त भारताच्या इतर तरुण अ‍ॅथलीट्सनीही राष्ट्रीय विक्रमांची नोंद करत मैदानावर सुवर्ण आणि रौप्य पदकांची लूट केली आहे. पुरुष गटातील अत्यंत कठीण अशा ‘डेकॅथलॉन’ (10 क्रीडा प्रकार) स्पर्धेत राहुल जाखडनं 7,185 गुणांची नोंद करत सुवर्णपदक पटकावलं. या कामगिरीसह त्यानं नवा अंडर-20 राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याच प्रकारात भारताच्या उपकार सिंग गुर्करनं 6,854 गुणांसह रौप्यपदक जिंकून भारताला 1-2 अशी ऐतिहासिक आघाडी मिळवून दिली. पुरुष गटातचं 5,000 मीटर पायीचाल (Race Walk) शर्यतीमध्ये आर्मीच्या नितिन गुप्तानं 19:47.49 सेकंदांची वेळ नोंदवून भारताला स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.

तर महिलांच्या चक्काफेक (Discus Throw) प्रकारात अमानत कम्बोजनं उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. तसेच महिलांच्या त्रिकूद (Triple Jump) फायनलमध्ये साधना रवीनं 12.84 मीटरची शानदार उडी मारत भारतासाठी रौप्यपदक निश्चित केलं.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत निपम चौहानने 11.62 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक जिंकून भारताचं खातं उघडलं होतं.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे गुणतालिकेत भारत सध्या अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर भक्कमपणे उभा आहे. हे यश ऑगस्ट 2026 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड अंडर-20 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.