सिनरने पटकावले माद्रिद ओपन;’अशी’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Madrit Open 2026: जागतिक टेनिसमधील जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या जॅनिक सिनरनं (Jannik Sinner) माद्रिदमध्ये इतिहास रचला आहे. रविवारी (3 मे 2026) झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करून पहिल्यांदाच माद्रिद ओपनच्या चषकावर आपलं नाव कोरलं. या विजयामुळे सिनरनं टेनिस विश्वातील एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो यापूर्वी ‘बिग थ्री’ (फेडरर, नदाल, जोकोविच) मधील कोणालाही जमला नव्हता.

हा ऐतिहासिक अंतिम सामना स्पेनची राजधानी माद्रिद येथील ‘काजा मॅजिका’ (Caja Magica) स्टेडियममधील ‘मानोलो सांताना’ कोर्टवर पार पडला. अवघ्या 56 मिनिटे चाललेल्या या एकतर्फी सामन्यात सिनरनं झ्वेरेव्हला 6-1, 6-2 अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं. सिनरनं सामन्याच्या पहिल्याच सेटपासून वर्चस्व गाजवलं आणि अवघ्या 17 मिनिटांत 5-0 अशी मोठी आघाडी घेतली. झ्वेरेव्हला संपूर्ण सामन्यात एकही ‘ब्रेक पॉईंट’ मिळवता आला नाही, जे सिनरच्या जबरदस्त प्रदर्शनाचा पुरावा आहे.

या स्पर्धेतील त्याचेे विक्रम
जॅनिक सिनर हा 1990 मध्ये एटीपी मास्टर्स 1000 मालिका सुरू झाल्यापासून सलग पाच मास्टर्स जेतेपदे जिंकणारा जगातील पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. त्यानं गेल्या वर्षी पॅरिसमध्ये आणि 2026 मध्ये इंडियन वेल्स, मियामी, मॉन्टे-कार्लो आणि आता माद्रिद अशा पाचही स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला आहे.

तो एकाच हंगामातील (2026) सुरुवातीच्या चारही मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकणारा इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे.

वयाच्या 24 व्या वर्षी त्यानं सर्व नऊ एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा विक्रम पूर्ण केला असून, अशी कामगिरी करणारा तो चौथा आणि सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

जॅनिकची ही विजयी घोडदौड आता त्याला आगामी ‘फ्रेंच ओपन’साठी सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.