जॅनिक सिनरनं केली रॉजर फेडररच्या ‘सनशाईन डबल’ विक्रमाची नऊ वर्षांनी बरोबरी!

Miami Open 2026: टेनिस विश्वात सध्या जॅनिक सिनरचा विजयच पाहायला मिळत आहे. रविवारी (29 मार्च) मियामी गार्डन्समधील प्रसिद्ध हार्ड रॉक स्टेडियमवर पार पडलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनरनं चेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेकावर मात करून कारकिर्दीत दुसऱ्यांदा मियामी ओपनचं जेतेपद जिंकलं. या विजयामुळे सिनरने एकाच मोसमात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन या दोन्ही स्पर्धा जिंकून ऐतिहासिक ‘सनशाईन डबल’ (Sunshine Double) पूर्ण केला आहे. तसेच या विजयासह सिनरनं रॉजर फेडररच्या 9 वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

या सामन्यात पावसाने दोनदा व्यत्यय आणला. सुरुवातीला पावसामुळे खेळाला उशीर झाला होता. पण सुरुवातीलाच सर्व्हिस ब्रेक करून 3-1 अशी सिनरनं आघाडी घेतली आणि नंतर आपल्या सर्व्हिसच्या जोरावर एकही गुण न गमावता पहिला सेट त्यानी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा पाऊस आल्यानं खेळ सुमारे 80 ते 90 मिनिटे स्थगित करावा लागला होता. पुन्हा सामना सुरू झाल्यावर लेहेकानं दुसऱ्या सेटमध्ये दोन सर्व्हिस गेम्समध्ये पाच ब्रेक पॉइंट्स वाचवले होते पण शेवटी सिनरनं आपला अनुभव दाखवत लेहेकावर 6-4 असा दुसरा सेट जिंकत सामना आपल्या नावावर केला. म्हणजेच सिनरनं 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये त्याचा (जिरी लेहेक) पराभव केला.

सिनरनं संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावता हे विजेतेपद मिळवलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं 10 एसीस (Aces) लगावले आणि आपल्या पहिल्या सर्व्हिसवर 92% गुण मिळवून वर्चस्व राखलं.

सामना जिंकल्यावर प्रतिक्रिया देताना सिनर म्हणाला, “हा माझ्यासाठी अत्यंत खास क्षण आहे. इंडियन वेल्सनंतर इथेही चांगली कामगिरी करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. शारीरिकदृष्ट्या ही स्पर्धा थकवणारी होती, पण माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे”.

विक्रम (record)
2017 मध्ये रॉजर फेडररनं सनशाईन डबल जिंकण्याचा पराक्रम केला होता, त्यानंतर ही कामगिरी करणारा सिनर हा पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला आहे. या विजयासह सिनरनं फेडररच्या 9 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे, तसेच 2026 च्या हंगामातील आपला रेकॉर्ड 19-2 असा सुधारला आहे. त्यानं यावर्षी आतापर्यंत मियामी ओपनसह ऑस्ट्रेलियन ओपन आणि रॉटरडॅम इंडोर्स ही विजेतेपदेही पटकावली आहेत.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.