Jannik Sinner: जगातील अव्वल मानांकित टेनिसपटू जॅनिक सिन्नरनं माद्रिद ओपन 2026 मध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत (Semifinals) धडक मारली आहे. या विजयामुळे त्यानं एक असा दुर्मिळ विक्रम प्रस्थापित केला आहे, जो टेनिस इतिहासातील मोजक्याच महान खेळाडूंना जमला आहे. ही स्पर्धा स्पेनमधील माद्रिद येथील ‘काजा मॅजिका’ (Caja Magica) येथे क्ले-कोर्टवर खेळवली जात आहे.
बुधवारी (29 एप्रिल) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जॅनिक सिन्नरनं स्पेनच्या 19 वर्षीय उदयोन्मुख खेळाडू राफेल जोडर (Rafael Jodar) याचा 6-2, 7-6 (0) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिन्नरनं पहिल्या सेटमध्ये 33 मिनिटांत पूर्ण वर्चस्व गाजवलं, तर दुसऱ्या सेटमध्ये जोडरनं कडवी झुंज दिली. मात्र, टायब्रेकरमध्ये सिन्नरनं सलग 7 गुण मिळवून 7-0 अशा फरकानं सेट आणि सामना जिंकला. यापूर्वी त्यानं उपउपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या कॅमेरन नॉरीचा 6-2, 7-5 असा पराभव केला होता.
या विजयामुळे जॅनिक सिन्नरनं आपल्या कारकिर्दीत नऊच्या नऊ ‘एटीपी मास्टर्स 1000’ (ATP Masters 1000) स्पर्धांची उपांत्य फेरी गाठली आहे. 1990 मध्ये ही मालिका सुरू झाल्यापासून अशी कामगिरी करणारा तो फक्त सहावा खेळाडू ठरला आहे. त्यानं आता रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
सलग 21 सामने जिंकणारा सिन्नर आता शुक्रवारी, 1 मे 2026 रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या 21 वर्षीय आर्थर फिल्स (Arthur Fils) याच्याशी भिडणार आहे.
सिन्नर सध्या सलग पाच मास्टर्स 1000 जेतेपदे जिंकणारा इतिहासातील पहिला खेळाडू बनण्याच्या प्रयत्नात आहे. या मोसमात त्यानं आतापर्यंत इंडियन वेल्स, मियामी आणि मॉन्टे-कार्लो अशा तिन्ही मास्टर्स स्पर्धा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
आणखी हेही वाचा
रोहित शर्माचे हे ‘५’ रेकॉर्ड तोडण अशक्य!-https://agcsport.tv/cricket/these-5-records-of-rohit-sharma-are-impossible-to-break/

