Billie Jean King Cup: भारतीय महिला टेनिस संघ आगामी बिली जीन किंग चषक ‘आशिया/ओशियानिया गट १’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. ही स्पर्धा 7 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील डीएलटीए (DLTA) संकुलात पार पडणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेत भारतीय संघ जागतिक गटाच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रिंगणात उतरणार आहे.
गेल्या वर्षी (2025) पुण्यात झालेल्या स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली होती. 5 पैकी 4 सामने जिंकून संघ न्यूझीलंडच्या मागं दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दुसऱ्यांदा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला होता. मात्र, प्ले-ऑफमध्ये भारताला स्लोव्हेनिया आणि नेदरलँड्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
विशाल उप्पल यांनी संघाच्या तयारीवर समाधान व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “टेनिस हा वैयक्तिक खेळ असला तरी, येथे सांघिक प्रयत्नांना महत्त्व आहे. गेल्या वर्षीच्या कामगिरीतून आम्हाला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. दिल्लीतील उष्ण हवामानाचा आम्हाला फायदा होईल आणि प्रेक्षकांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे खेळाडू अधिक चांगली कामगिरी करतील अशी मला खात्री आहे”
भारतीय संघ आणि खेळाडू
विशाल उप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं अनुभव आणि नवीन खेळाडूंसह ५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे
अंकिता रैना: संघातील सर्वात अनुभवी खेळाडू.
सहजा यमलापल्ली: असलेली उदयोन्मुख खेळाडू.
ऋतुजा भोसले: दुहेरीतील कुशल आणि अनुभवी खेळाडू.
श्रीवल्ली भामिदीप्ती: गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील भारताची स्टार खेळाडू.
वैष्णवी अडकर: या स्पर्धेत पदार्पण करणारी युवा खेळाडू.
राखीव खेळाडू: वैदेही चौधरी.
सहभागी देश
या स्पर्धेत यजमान भारतासह एकूण ६ देश सहभागी होणार आहेत.
1. भारत (यजमान)
2. दक्षिण कोरिया
3. न्यूझीलंड
4. थायलंड
5. इंडोनेशिया
6. मंगोलिया
हे सर्व संघ ‘राऊंड-रॉबिन’ पद्धतीनं एकमेकांशी खेळतील. यातील अव्वल दोन संघ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील.

