बार्सिलोना ओपन २०२६: कार्लोस अल्काराजची विजयी सुरुवात

Barcelona Open 2026: जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्काराजनं आपल्या घरच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘बार्सिलोना ओपन 2026’ मध्ये धडाकेबाज सुरुवात केली आहे. मंगळवारी, 14 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या 32 व्या फेरीच्या सामन्यात अल्काराजनं फिनलंडच्या ओटो व्हर्टाननचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

सामन्याच्या सुरुवातीला अल्काराज काहीसा संथ वाटला आणि त्यानं काही अनपेक्षित चुकाही केल्या. मात्र, पहिल्या सेटमध्ये 5-4 अशा स्थितीत असताना त्यानं उजव्या मनगटाच्या दुखापतीसाठी (Wrist issue) ‘मेडिकल टाईमआउट’ घेतला होता. उपचार घेऊन परतल्यानंतर त्यानं जोरदार पुनरागमन केलं आणि पहिला सेट 6-4 ने आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये अल्काराज पूर्ण लयीत दिसला. त्यानं सलग दोन वेळा व्हर्टाननची सर्व्हिस ब्रेक केली आणि 6-2 अशा फरकानं हा सेट आणि सामना सहज जिंकला.

बार्सिलोना ओपनमध्ये येण्यापूर्वी अवघ्या दोन दिवसांपूर्वी तो मॉन्टे-कार्लो मास्टर्सच्या अंतिम फेरीत जॅनिक सिनरकडून पराभूत झाला होता. पण बार्सिलोनामधील ‘पिस्टा राफा नदाल’ कोर्टवर सुमारे 85 मिनिटे चाललेल्या या सामन्यात अल्काराजनं आपल्या अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

अल्काराजनं प्रतिक्रिया दिली की, मॉन्टे-कार्लोमधील वातावरण आणि येथील कोर्टची परिस्थिती वेगळी असल्यानं सुरुवातीला थोडा त्रास झाला. “आज सकाळीच मी येथे पहिल्यांदा सराव केला होता, त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे नव्हते, पण मी ज्या पद्धतीनं खेळलो त्यावर मी आनंदी आहे,” असंही त्यानं नमूद केलं.

तसेच त्यानं पहिल्या सेटमध्ये उजव्या मनगटाच्या (Wrist) त्रासामुळे ‘मेडिकल टाईमआउट’ घेतला होता. यावरही त्यानं प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “सलग स्पर्धा खेळल्यामुळे छोटे-मोठे त्रास (niggles) होणे स्वाभाविक आहे, पण मला आशा आहे की, हे गंभीर काही नसेल”

अल्काराजचा पुढचा सामना (अंतिम 16 ची फेरी) गुरुवारी (16 एप्रिल 2026) चेक प्रजासत्ताकच्या टोमास माचाच (Tomáš Macháč) सोबत होणार आहे. जर अल्काराजनं ही स्पर्धा जिंकली, तर त्याला पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे.

आणखी हेही वाचा
रिझवानने वॉर्नरवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला?-
https://agcsport.tv/cricket/did-rizwan-pressure-warner-to-convert-to-islam/

भारतात होणारी फॉर्म्युला वन लांबणीवर?-https://agcsport.tv/other/formula-one-india-return-governments-target-is-2027-while-fia-hints-at-2029/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.