फेडरेशन कप २०२६ मध्ये अनेक नवे राष्ट्रीय विक्रम; कोण आहेत हे खेळाडू

Federation Cup 2026: झारखंडमधील रांची येथील मोराबादी भागातील ऐतिहासिक बिरसा मुंडा स्टेडियमवर सुरू आहे. या 29 व्या राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन कप 2026 (Federation Cup 2026) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय विक्रम (National Records) मोडले आहेत. 22 ते 25 मे 2026 दरम्यान आयोजित या 4 दिवसीय प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील शेकडो अव्वल अ‍ॅथलीट्स सहभागी झाले आहेत. ग्लास्गो येथे होणाऱ्या आगामी कॉमनवेल्थ गेम्स 2026 (CWG) ची ही एकमेव निवड चाचणी असल्यानं खेळाडूंनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे.

100 मीटर शर्यतीतील रेकॉर्ड
पुरुष गटातील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत (Semifinals) अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं राष्ट्रीय विक्रम दोनदा मोडीत निघाला. आधी 24 वर्षीय गुरिंदरवीर सिंगनं 10.17 सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला, पण दुसऱ्याच हीटमध्ये 22 वर्षीय अनिमेश कुजूरनं 10.15 सेकंद वेळेसह तो रेकॉर्ड लगेच आपल्या नावावर केला. मात्र, शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात (Final) गुरिंदरवीर सिंगनं 10.09 सेकंदांची अविश्वसनीय वेळ नोंदवून सुवर्णपदकासह पुन्हा एकदा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तसेच 100 मीटरच्या शर्यतीत हा टप्पा ओलांडणारा तो भारताच्या इतिहासातील पहिलाच पुरुष धावपटू ठरला आहे.

इतर काही रेकॉर्ड्स
पुरुष गटातील 400 मीटर शर्यतीमध्ये तामिळनाडूच्या विशाल टी. के. यानं 44.98 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावलं. 400 मीटर शर्यत 45 सेकंदांच्या आत पूर्ण करणारा तो भारताचा पहिलाच धावपटू बनला असून त्यानं स्वतःचाच जुना राष्ट्रीय विक्रम (45.12 सेकंद) मोडीत काढला आहे. दुसरीकडे, तब्बल 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या अत्यंत कठीण अशा ‘डेकॅथलॉन’ (Decathlon) प्रकारात भारताच्या तेजस्विनी शंकरनं 8,057 गुणांची नोंद करत स्वतःचा जुना विक्रम मोडीत काढला आणि नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. अ‍ॅन्सी सोजन हिनं महिलांच्या लांब उडीत 6.75 मीटर झेप घेत मीट रेकॉर्ड नोंदवला.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा ट्रॅक अँड फील्डमधील स्तर कमालीचा उंचावला असून फेडरेशन कप 2026 मधील हे यश आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचा पाया भक्कम करणारे ठरेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.