Australian Open Badminton 2026: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध ‘क्वेसेंटर’ (Quaycentre) मैदानावर सुरू ही स्पर्धा सुरू आहे. या प्रतिष्ठित साथिओ ग्रुप ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन २०२६ (BWF सुपर ५००) स्पर्धेत भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) हिनं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. आज (गुरुवार, ११ जून) खेळवल्या गेलेल्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या (Pre-Quarterfinals) अत्यंत बहुप्रतिक्षित ‘ऑल-इंडियन’ सामन्यात सिंधूनं भारताच्याच उदयोन्मुख इशाराणी बरुआ (Isharani Baruah) हिचा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinals) प्रवेश केला आहे.
आंतरराष्ट्रीय बीडब्ल्यूएफ (BWF) टूरवर या दोन्ही भारतीय खेळाडूंचा आमनेसामने येण्याचा हा पहिलाच प्रसंग होता, ज्यामध्ये अनुभवाच्या जोरावर सिंधूनं बाजी मारली. तिनं जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेल्या इशाराणी बरुआविरुद्ध २२-२०, २१-१२ अशा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये तरुण इशाराणीनं सिंधूला नेट प्ले आणि उत्कृष्ट रॅलीजच्या जोरावर अत्यंत चुरशीची टक्कर दिली होती, ज्यामुळे गेम २०-२० अशा बरोबरीत पोहोचला होता. मात्र, मोक्याच्या क्षणी सिंधूनं दोन सलग गुण घेत पहिला गेम २२-२० ने आपल्या नावावर केला. या मानसिक दबावानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं पूर्ण वर्चस्व गाजवत इशाराणीला अवघ्या १२ गुणांवर रोखलं आणि सामना दिमाखात खिशात घातला.
या शानदार विजयासोबतच पी. व्ही. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं आहे. तिचा पुढील उपांत्यपूर्व फेरीचा (Quarter Finals) सामना उद्या (१२ जून) चायनीज तैपेईच्या चेन सु-यु (Chen Su-yu) विरुद्ध खेळवला जाणार आहे. जेतेपदाच्या दुष्काळाला पूर्णविराम देण्यासाठी सिंधूला उद्याच्या सामन्यातही अशाच सर्वोत्तम कामगिरी करेल अशी अनेक भारतीय चाहत्यांनी आशा आहे.

