Norway Chess 2026: नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील ‘डीचमन ब्योर्विका’ सार्वजनिक ग्रंथालयात सुरू असलेल्या प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ २०२६ (Norway Chess) स्पर्धेच्या कालच्या नवव्या फेरीत भारतीय बुद्धिबळ चाहत्यांसाठी संमिश्र आणि थरारक दिवस राहिला. १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदनं आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत थेट क्लासिकल सामन्यात विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेशचा पराभव करून गुणांची ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. या मोठ्या विजयासह प्रज्ञानंद १५ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेत जेतेपदाच्या शर्यतीत भक्कमपणे कायम राहिला आहे.
प्रज्ञानंद विरुद्ध गुकेश सामन्याचा थरार
काल झालेल्या ‘ऑल-इंडियन’ रोमांचक लढतीत आर. प्रज्ञानंद काळ्या सोंगाट्यांनी (Black Pieces) खेळत होता. गुकेशनं सुरुवातीला ‘निंझो-इंडियन’ ओपनिंग खेळत अतिशय आक्रमक रणनीती आखली. मात्र, मध्य टप्प्यात (Middlegame) वेळ आणि पोझिशनच्या दबावाखाली गुकेशनं एक गंभीर चूक केली. प्रज्ञानंदनं कोणतीही चूक न करता ३४ चालींमध्ये गुकेशला पराभूत करून सलग तिसरा क्लासिकल विजय नोंदवला. याआधी त्यानं फिरौजा आणि कार्लसनला नमवलं होतं.
तर दुसरीकडे, महिला गटामध्ये भारतासाठी कालचा दिवस निराशाजनक ठरला. महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला चीनच्या जू जिनरकडून थेट क्लासिकल सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे ती तिसऱ्या स्थानावर घसरली. अनुभवी कोनेरू हंपीचा सामना जागतिक चॅम्पियन जू वेनजुन विरुद्ध क्लासिकलमध्ये ड्रॉ झाला, मात्र टायब्रेकरमध्ये हंपी पराभूत झाली. या निकालांमुळे कझाकिस्तानच्या बिबिसारा अस्सौबायेवा हिनं एक फेरी शिल्लक असतानाच ऐतिहासिक ‘नॉर्वे बुद्धिबळ महिला २०२६’ चे विजेतेपद पटकावून ७५ हजार डॉलर्सचं पहिलं बक्षीस निश्चित केलं आहे.
गुणतालिका आणि जेतेपदाचे अंतिम समीकरण
नवव्या फेरीअखेर ओपन गटामध्ये अमेरिकेचा वेस्ली सो १५.५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानं काल मॅग्नस कार्लसनला आर्मागेडॉन टायब्रेकरमध्ये हरवलं. भारताचा प्रज्ञानंद १५ गुणांसह दुसऱ्या, तर अलिरेझा फिरौजा १४.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुकेश ८ गुणांसह सर्वात शेवटी आहे. आज रंगणाऱ्या अंतिम दहाव्या फेरीत प्रज्ञानंदचा सामना जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरविरुद्ध पांढऱ्या सोंगाट्यांसह होणार असून, भारताला जेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

