Norway Chess 2026: काल १ जून २०२६ रोजी रंगलेल्या सामन्यांमध्ये भारताचा युवा स्टार आर. प्रज्ञानंदनं थेट क्लासिकल डावात विजय मिळवून खळबळ उडवली, तर जागतिक विजेता डी. गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी टायब्रेकरमध्ये बाजी मारली. ही स्पर्धा नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील प्रसिद्ध ‘डीचमन ब्योर्विका’ सार्वजनिक ग्रंथालयात सुरू आहे. या प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ २०२६ (Norway Chess) स्पर्धेच्या सातव्या फेरीत भारतीय खेळाडूंनी कमालीच्या जिद्दीनं शानदार पुनरागमन केलं आहे.
‘ओपन’ गटामध्ये मागिल फेरीत सलग दोन पराभवांमुळे बॅकफूटवर गेलेल्या १८ वर्षीय आर. प्रज्ञानंदनं पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना फ्रान्सच्या तगड्या अलिरेझा फिरौजाचा ५१ चालींमध्ये एकतर्फी धुव्वा उडवला. या शानदार क्लासिकल विजयामुळे प्रज्ञानंदला थेट ३ पूर्ण गुण मिळाले. दुसऱ्या महत्त्वाच्या सामन्यात, विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेशने स्पर्धेत आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या वेस्ली सो विरुद्धचा क्लासिकल सामना उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ड्रॉ (अनिर्णित) राखला. त्यानंतर झालेल्या अत्यंत वेगवान ‘आर्मागेडॉन’ (Armageddon) टायब्रेकर लढतीत गुकेशनं वेस्ली सो याला पराभूत करून १.५ गुण खिशात घातले.
दिव्या देशमुख दुसऱ्या स्थानी कायम
महिला गटामध्ये भारताच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये, म्हणजेच दिव्या देशमुख आणि अनुभवी कोनेरू हंपी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्याचा मूळ क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्यानंतर खेळवल्या गेलेल्या आर्मागेडॉन टायब्रेकरमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखनं काळ्या सोंगाट्यांनी अप्रतिम खेळ करत कोनेरू हंपीचा पराभव केला.
सातव्या फेरीअखेर ओपन गटामध्ये अमेरिकेचा वेस्ली सो १२.५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. फ्रान्सचा अलिरेझा फिरौजा १० गुणांसह दुसऱ्या, तर मॅग्नस कार्लसन (ज्याने व्हिन्सेंट कीमरला आर्मागेडॉनमध्ये हरवले), व्हिन्सेंट कीमर आणि भारताचा आर. प्रज्ञानंद हे प्रत्येकी ९ गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. गुकेश अजूनही गुणतालिकेत सर्वात तळाला आहे. महिला गटामध्ये कझाकिस्तानची बिबिसारा अस्सौबायेवा १२.५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर मजबूत उभी असून भारताची दिव्या देशमुख १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर तिचा पाठलाग करत आहे.
आज २ जून २०२६ रोजी होणाऱ्या आठव्या फेरीत दिव्या देशमुखचा सामना आघाडीवर असलेल्या बिबिसारा अस्सौबायेवाविरुद्ध होणार आहे. यात दिव्या थेट सुवर्ण संधी असेल पहिल्या स्थानावर जाण्यासाठी, त्यामुळे या सामन्याकडे अनेक बुद्धिबळ चाहत्यांचं लक्ष लागले आहे.

