Virat and djokovic: जागतिक क्रीडा विश्वातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘लॉरेयस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026’ (Laureus World Sports Awards) चा सोहळा नुकताच माद्रिदमध्ये पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात टेनिसमधील ‘ग्रँड स्लॅमचा राजा’ नोव्हाक जोकोविचनं भारतीय क्रिकेटचा दिग्गज विराट कोहलीबद्दल केलेल्या वक्तव्यानं सध्या क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. “विराट कोहली हा माझा चांगला मित्र आहे आणि फक्त त्याच्यामुळेच मी क्रिकेट फॉलो करायला सुरुवात केली,” असं भावनिक विधान जोकोविचनं यावेळी केलं. याच वाक्यामुळे सध्या क्रिकेट जगतात सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना जोकोविचनं या दोघांच्या अनोख्या मैत्रीचा उलगडा केला. विशेष म्हणजे, हे दोन महान खेळाडू अद्याप प्रत्यक्ष भेटलेले नाहीत. त्यांची मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाली. विराटनं एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यानं जोकोविचला इन्स्टाग्रामवर मेसेज करण्याचा विचार केला, तेव्हा त्याला समजलं की जोकोविचनं आधीच त्याला शुभेच्छांचा मेसेज पाठवला होता. तेव्हापासून या दोन जागतिक स्तरावरील दिग्गजांमध्ये सातत्यानं संवाद सुरू असतो.
काय बोलला जोकोविच विराटबद्दल
जोकोविचनं यावेळी विराटच्या खेळाचं आणि त्याच्या मैदानातील जिद्दीचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, “विराट ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळतो आणि त्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याचा मी आदर करतो. मी भारतात येण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि विराटसोबत टेनिस किंवा क्रिकेटची बॅट हातात घेऊन वेळ घालवायला मला नक्कीच आवडेल.”
आयपीएल 2026 मध्ये विराट सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या वर्षी (2025) आरसीबीला पहिलं जेतेपद मिळवून दिल्यानंतर यंदाही तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
तर दुसरीकडं, टेनिस कोर्टवर अधिराज्य गाजवत असलेला नोवाक जोकोविच. यानं आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर केले आहेत. वयाची तिशी ओलांडल्यानंतरही त्याचा फिटनेस आणि जिंकण्याची भूक अजूनही कायम आहे. तसेच त्याला 25 वे ग्रँड स्लॅम जिंकायची इच्छा आहे.
आणखी हेही वाचा
फ्रेंच ओपनमध्ये कार्लोस अल्काराझ दुखापतीमुळे माघार घेण्याचे संकेत-https://agcsport.tv/tennis/carlos-alcaraz-hints-at-french-open-withdrawal-due-to-injury/
आयपीएलला पसंती; दासुन शनाकावर पीएसएलमध्ये एका वर्षाची बंदी-https://agcsport.tv/cricket/ipl-preferred-dasun-shanaka-banned-for-one-year-in-psl/

