फॉर्म्युला वन: भारतातील एफ 1 चाहत्यांसाठी एक संमिश्र बातमी समोर आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी 2027 पर्यंत फॉर्म्युला वन (F1) भारतात परत आणण्याचे सकारात्मक संकेत दिले असले, तरी ‘फेडरेशन इंटरनॅशनल डी ल’ऑटोमोबाईल’ (FIA) आणि F1 व्यवस्थापनानं मात्र 2029 पूर्वी हे शक्य नसल्याचं सुचवलं आहे. भारताला जागतिक क्रीडा केंद्र बनवण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेचा एक भाग म्हणून या हालचाली सुरू झाल्या आहेत.
क्रीडा मंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (BIC) येथे पुन्हा एकदा गाड्यांचा थरार पाहायला मिळू शकतो. यासाठी सरकार करविषयक (Taxation) जुने वाद मिटवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना सवलती देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. यात अनेक मोठ्या कंपन्यांनीही बुद्ध सर्किटच्या व्यवस्थापनात रस दाखवला आहे, ज्यामुळे पुनरागमनाच्या आशा जागृत झाल्या आहेत.
एफ-1 चे मत काय?
मात्र, एफ 1 व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे की, 2027 चं वेळापत्रक आधीच भरलेलं असून नवीन शर्यतीसाठी जागा मिळणं कठीण आहे. एका अधिकृत निवेदनात एफ1 नं म्हटलं आहे की, “भारत ही एक महत्त्वाची बाजारपेठ आणि आमच्यासाठी आवडीचा देश आहे, पण 2027 मध्ये शर्यत होण्याची शक्यता कमी आहे”. तज्ज्ञांच्या मते, सर्किटचं नूतनीकरण आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागणार असल्यानं 2029 हे वर्ष पुनरागमनासाठी अधिक वास्तववादी मानलं जात आहे.
इतिहास आणि बंद पडण्याची कारणे
भारतात पहिल्यांदा 2011 मध्ये बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर ‘इंडियन ग्रांप्री’ (Indian Grand Prix) पार पडली होती. 2011 ते 2013 या काळात सलग तीन वर्षे ही स्पर्धा झाली आणि तिन्ही वेळा सेबॅस्टियन वेटेलनं विजेतेपद पटकावलं. मात्र, तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारनं या स्पर्धेला ‘क्रीडा’ ऐवजी ‘मनोरंजन’ (Entertainment) या श्रेणीत टाकल्यामुळे प्रचंड कर आकारला गेला. वाढता कर, कायदेशीर गुंतागुंत आणि आर्थिक तोटा यामुळे पाच वर्षांचा करार असूनही 2014 मध्ये ही स्पर्धा कायमची बंद झाली.
विकी चंडोक यांचे मत
एफएमएससीआयचे (FMSCI) माजी अध्यक्ष विकी चंडोक यांनी या घडामोडींवर सकारात्मकता व्यक्त केली आहे. त्यांनी अलीकडेच क्रीडा मंत्र्यांची भेट घेतली आणि सांगितलं की, प्रथमच सरकार स्वतःहून या खेळाला पाठिंबा देण्यासाठी पुढं येत आहे. भारताची तांत्रिक प्रगती पाहता, एफ1 सारख्या हाय-टेक खेळाचं पुनरागमन देशासाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

