Maharashtra kesari 2026: काल (22 मार्च) पुण्यातील वाघोली येथील ‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत’ आयोजित 68 वी महाराष्ट्र केसरी (2026) कुस्ती स्पर्धा पार पडली. त्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यानं या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे.
माती विभाग
काल माती विभागाच्या फायनलमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. मात्र या स्पर्धेत अनेकांना वाटत होतं सिकंदर शेख बाजी मारेल, पण महेंद्र गायकवाड यानं त्याचा पराभव करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्या पराभवामुळे सिकंदरचा तिथेच प्रवास संपला. आणि महेंद्र गायकवाड यानं माती विभाग जिंकून महाराष्ट्र केसरी गादी विभागाची फायनल गाठली.
गादी विभाग
या विभागातून नाशिकचा हर्षवर्धन सदगीर फायनलला गेला होता. त्याने उपांत्य फेरीत (सेमीफायनल) जोरदार कामगिरी केली, तर सोलापूरच्या जय पाटील याने गतविजेत्या पृथ्वीराज मोहोळला पराभूत करून गादी विभागाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. अखेर हर्षवर्धनने गादी विभागाचे विजेतेपद पटकावून मुख्य फायनलमध्ये प्रवेश केला.
यंदाच्या स्पर्धेत धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. दोनवेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, गतविजेता पृथ्वीराज मोहोळ आणि पृथ्वीराज पाटील या तिन्ही महाराष्ट्र केसरी विजेत्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. तसेच सिकंदर शेखलाही माती विभागाच्या फायनलमध्ये महेंद्र गायकवाडकडून पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना
मुख्य अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडनं आक्रमक सुरुवात करत 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, हर्षवर्धननं आपल्या अनुभवाच्या जोरावर संयमी खेळ करत पुनरागमन केलं. पहिल्या फेरीनंतर 1-1 अशी बरोबरी होती. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धननं 4-3 अशी आघाडी मिळवली आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती टिकवून ठेवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. तसेच त्यानं या विजयामुळे डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मानही मिळवला. आणि तो सातवा असा मल्ल ठरला ज्यानं डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.
हर्षवर्धन याला बक्षिस म्हणून काय मिळालं?
रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या हर्षवर्धन सदगीर याला मानाची चांदीची गदा, 5 लाख रूपयांचे रोख बक्षिस आणि फॉर्चुनर गाडी देण्यात आली आहे. तर उपविजेता राहिलेला महेंद्र गायकवाड याला चार लाख रोख आणि स्कॉर्पिओ देण्यात आली आहे.
यंदाच्या स्पर्धेच वैशिष्ट्ये काय होते?
महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात पहिल्यांदाच या 2026 च्या स्पर्धेत पाच महाराष्ट्र केसरी सहभागी झाले होते. शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज मोहोळ, सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर. मात्र हर्षवर्धन सदगीर यालाच अंतिम फेरी गाठता आली आणि त्यात त्याने विजय मिळवला.

