Tribal Games 2026: छत्तीसगडमधील जगदालपूर येथे आयोजित खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 (Khelo India Tribal Games 2026) मध्ये अरुणाचल प्रदेशची नेदी एनजी आणि महाराष्ट्राचा गोविंद पाडेकर यांनी 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. ही स्पर्धा छत्तीसगडमधील जगदालपूर येथे 30 मार्च 2026 रोजी पार पडली.
विजेत्या खेळाडूंची कामगिरी
महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत अरुणाचल प्रदेशच्या नेदी एनजीनं 18:24.66 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवलं. ती एक उत्कृष्ट मध्यम पल्ल्याची धावपटू आहे. तिची ही कामगिरी अरुणाचल प्रदेशला पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी महत्त्वाची ठरली.
गोविंद पाडेकर या महाराष्ट्राच्या धावपटूची पुरुषांच्या 5000 मीटर गटात चांगली कामगिरी पहायला मिळाली. गोविंदनं 15:11.35 सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अत्यंत शिस्तबद्ध धाव करत आपल्या सहकाऱ्याला (सूरज माशी, 15:11.64 से.) मागं टाकून अव्वल स्थान गाठलं.
या स्पर्धेनंतर हे दोन्ही खेळाडूचं लक्ष्य राष्ट्रीय कॅम्पमध्ये निवड, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग आणि भारतासाठी पदके जिंकणे यावर असेल.
कालच्या दिवसभरातील कामगिरीमुळे कर्नाटक 17+ सुवर्णपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून ओडिशा नऊ सुवर्णपदकांसह दुसऱ्या आणि अरुणाचल प्रदेश सहा सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

