DC vs RR IPL 2026: काल (1 मे) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 43 व्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) संघानं राजस्थान रॉयल्स (RR) वर 7 गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. सलग तीन पराभवानंतर दिल्ली अखेर पराभवाची मालिका तोडली आणि विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रियान परागनं 50 चेंडूंत 90 धावांची (8 चौकार, 5 षटकार) वादळी खेळी करत संघाला सावरलं. त्याला ध्रुव जुरेल (42 धावा) आणि अखेरच्या षटकांत डोनाव्हन फरेरा यानं अवघ्या 14 चेंडूंत नाबाद 47* धावा (6 षटकार) करून मोलाची साथ दिली. राजस्थाननं 20 षटकांत 6 बाद 225 धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कनं 40 धावांत 3 बळी घेत यशस्वी पुनरागमन केलं.
प्रत्युत्तरात 226 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं दमदार सुरुवात केली. सलामीवीर के.एल. राहुलनं 40 चेंडूंत 75 धावा आणि पथुम निसांकानं 33 चेंडूंत 62 धावा करून 110 धावांची सलामी दिली. मध्य फळीत नितीश राणा (33 धावा) आणि शेवटी आशुतोष शर्मा (25) व ट्रिस्टन स्टब्स (18) यांनी फिनिशिंग टच देत 19.1 षटकांतच लक्ष्य गाठलं. दिल्लीनं 3 बाद 226 धावा करत 5 चेंडू राखून सामना खिशात टाकला.
सामना कुठे फिरला?
हा सामना मुख्य दिल्लीच्या सलामीवीर फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये केलेल्या आक्रमक फटकेबाजीमुळे फिरला. मागील सामन्यात आरसीबीविरुद्ध अवघ्या 75 धावांत गारद झालेल्या दिल्लीनं या सामन्यात 226 धावांचा पाठलाग करून चांगल पुनरागमन केलं आहे. राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा धावा रोखण्यात अपयशी ठरले. तर दिल्लीत पुनरागमन केलेल्या मिचेल स्टार्कनं उत्तम गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला सगल तीन पराभवातून पुनरागमन करून हा विजय मिळण्यात मदत केली.
सध्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ 9 सामन्यांत 5 पराभव झाले आहेत तर 4 विजय मिळवून 8 गुणांसह ६व्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला 10 सामन्यात 4 पराभव मिळाले आहेत. तर 6 विजय मिळवून 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

