केकेआरचा पहिला विजय; ‘या’ कारणामुळे हरली राजस्थान

KKR vs RR IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात सलग पाच पराभवानंतर, अखेर कोलकत्ता नाईट रायडर्सनं नुकत्याच आपल्या घरच्या मैदानावर (ईडन गार्डन्स) झालेल्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं आहे. रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात केकेआरनं बलाढ्य राजस्थान रॉयल्सचा (RR) 4 गड्यांनी पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे केकेआरचा ‘फिनिशर’ रिंकू सिंग, ज्यानं कठीण प्रसंगात नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला.

राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर वैभव सूर्यवंशी (46 धावा) आणि यशस्वी जयस्वाल यांनी 81 धावांची भक्कम सलामी दिली होती. मात्र, त्यानंतर केकेआरच्या फिरकीपटूंनी सामन्याचं दृश्यचं बदलून टाकलं. वरुण चक्रवर्तीनं अवघ्या 14 धावांत 3 बळी घेत राजस्थानच्या मधल्या फळीचं कंबरडं मोडलं. त्याला सुनील नारायणनेही योग्य साथ (2 विकेट) दिली. ज्याप्रकारे राजस्थाननं सुरूवात केली होती त्याकडे पाहून असं वाटत होतं की, 200 धावांच्या पार सहज जातील पण परिणामी, मध्यल्या षटकांत त्यांच्या अनेक विकेट्स गेल्या आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारती आली नाही. शेवटी राजस्थानला 20 षटकांत 9 बाद 155 धावांवरच समाधान मानावं लागलं.

प्रत्युत्तरात 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उतरलेल्या केकेआरच्या संघाची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि टीम सायफर्ट हे दोघंही सलामी फलंदाज शून्यावर बाद झाले त्यामुळे संघावर सुरूवातीपासूनच दबाव वाढला. तसेच ज्याच्यावर संघाच्या आशा लागून होत्या तो कॅमरन ग्रीन सुद्धा स्वस्तात बाद झाला. एक वेळ अशीही आली होती की, केकेआरचा निम्मा संघ 70 धावांवर बेंचवर बसला होता. मात्र, केकेआरचा फिनिशर असणाऱ्या रिंकू सिंगनं जबाबदारी स्वीकारली. त्यानं 34 चेंडूंत नाबाद 53 धावांची अत्यंत संयमी आणि आक्रमक खेळी केली. शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज असताना रिंकूनं शांत डोक्यानं खेळ करत 19.4 षटकांत संघाला 161 धावांपर्यंत नेलं आणि विजय निश्चित केला.

सामना कुठे हरला?
राजस्थाननं सुरूवातीपासून केकेआरवर गोलंदाजीच्या जीवावर चांगली पकड बसवली होती. त्यांनी (राजस्थान) जवळपास सामना त्यांच्याकडेच झुकवला होता. रवींद्र जडेजाच्या षटकात केकेआरची शेवटची आशा असलेला रिंकू सिंग याचाही झेल मिळवणं शक्य होतं पण तो झेल नांद्रे बर्गर यानं सोडला. त्यावेळी तो फक्त 8 धावांवर खेळत होता. पण तो झेल सुटला आणि येथेच सगळा सामना फिरला. नंतर रिंकू सिंगला बाद करण्यात राजस्थानच्या गोलंदाजांना अपयश आलं आणि जो रिंकू सिंग आऊट ऑफ फॉर्म होता त्या रिंकूनं त्याच्या खेळीनं सगळा सामनाच केकेआरच्या बाजूनं वळवला. शेवटी त्यानं विजयी षटकार लावून आपल्या संघाला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.