सनशाईन डबल 2026: स्टार टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जॅनिक सिनरने (Jannik Sinner) मायामी ओपनमध्ये आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. शनिवारी (21 मार्च) झालेल्या ‘राउंड ऑफ 64’ च्या सामन्यात सिनरने बोस्नियाच्या डॅमिर झुमुरचा (Damir Dzumhur) पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
सिनरने कसा पराभव केला?
सिनरने सुरूवातीपासूनच आघाडी राखली आणि समोरच्यावर दबाब निर्माण केला. त्याने हा सामना सरळ सेटमध्ये 6-3, 6-3 असा खिशात घातला. सिनरने सामन्यात पूर्णपणे नियंत्रण राखले. त्याने 9 एसेस (Aces) डागले आणि पहिल्या सर्व्हिसवर 90% पॉईंट्स जिंकले. डॅमिर झुमुरला सिनरच्या अचूक सर्व्हिस आणि बॅकलाईनमधील आक्रमक खेळासमोर टिकता आले नाही. सिनरने संपूर्ण सामन्यात फक्त 8 गुण आपल्या सर्व्हिसवर गमावले.
कोणाच्या बरोबरीच्या वाटचालीवर?
या विजयामुळे सिनरने एटीपी मास्टर्स 1000 स्तरावर सलग 24 सेट जिंकण्याचा नोवाक जोकोविचचा विक्रम गाठला आहे. जर त्याने पुढच्या सामन्यातील पहिला सेट जिंकला, तर तो जोकोविचलाही मागे टाकेल. तसेच गेल्या आठवड्यात ‘इंडियन वेल्स’ जिंकल्यानंतर आता सिनर रॉजर फेडररच्या (2017) विक्रमाच्या बरोबरीने वाटचाल करत आहे.
जर त्याने मायामी ओपन जिंकली, तर एकाच वर्षात इंडियन वेल्स आणि मायामी अशा दोन्ही अमेरिकन हार्ड-कोर्ट स्पर्धा जिंकणारा तो 2017 नंतरचा पहिला खेळाडू ठरेल.
उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी आता तिसऱ्या फेरीत सिनरचा सामना 30 व्या मानांकित कोरेंटिन मौटेट (Corentin Moutet) विरुद्ध होणार आहे

