Indian Wells 2026: कॅलिफोर्नियामध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित Indian Wells स्पर्धेत इटलीच्या स्टार टेनिसपटू Jannik Sinnerने शानदार कामगिरी करत आपला पहिला किताब जिंकला. अंतिम सामन्यात त्याने Daniil Medvedevला 7-6(6), 7-6(4) अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. या विजयानंतर सिनरने इतिहासात विशेष स्थान मिळवले आहे. तो आता Novak Djokovic आणि Roger Federer यांच्या बरोबरीत आहे. सर्व सहा ATP Masters 1000 हार्ड-कोर्ट किताब जिंकणारा फक्त तिसरा खेळाडू ठरला आहे.
सिनरने कसा मिळवला विजय
रविवारी झालेल्या या अंतिम सामन्यात सिनरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. वेगवान कोर्टवर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये मेदवेदेवने सुरुवातीला दबाव निर्माण केला, मात्र दोघांमध्ये झालेल्या तगड्या संघर्षानंतर सेट टायब्रेकपर्यंत गेला. येथे सिनरने अधिक अचूक खेळ करत सेट आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही अशीच चुरस कायम राहिली. सिनरने काही महत्त्वाचे पॉइंट्स जिंकत आघाडी घेतली, पण मेदवेदेवने हार मानली नाही आणि सामना पुन्हा टायब्रेकमध्ये गेला. शेवटी निर्णायक क्षणी सिनरने आपला अनुभव आणि आत्मविश्वास दाखवत दुसराही टायब्रेक जिंकला आणि सामना खिशात घातला.
संपूर्ण सामन्यात सिनरने 28 विनर्स, 10 एसेस आणि सर्व 8 नेट पॉइंट्स जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयासह त्याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 1990 नंतर सलग Masters 1000 किताब एकही सेट न गमावता जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला असून त्याची सलग विजयांची मालिका आता 11 सामन्यांपर्यंत पोहोचली आहे. ही मालिका मागील वर्षी पॅरिसमध्ये जिंकलेल्या किताबापासून सुरू झाली होती.
विजयानंतर सिनर काय बोलला?
सामन्यानंतर बोलताना सिनरने सांगितले की, “मी माझ्यावर विश्वास ठेवला आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो. हा सामना खूप कठीण होता, पण मी माझ्या शॉट्सवर अधिक जोर दिला आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. हा विजय माझ्यासाठी खूप खास आहे.” त्याने पुढे मेदवेदेवच्या खेळाचेही कौतुक केले आणि तो पुन्हा उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतल्याचे सांगितले.
दरम्यान, मेदवेदेवने उपांत्य फेरीत Carlos Alcarazचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याची 16 सामन्यांची विजयी मालिका खंडित केली होती, मात्र इंडियन वेल्समध्ये त्याला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हा त्याचा या स्पर्धेतील तिसरा पराभूत अंतिम सामना ठरला.

