FIFA World Cup 2026: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सुरू असलेल्या साथिओ ग्रुप फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेत फुटबॉल विश्वातील दोन बलाढ्य संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. ‘गट क’ (Group C) मधील अत्यंत चुशीच्या ठरलेल्या या सामन्यात आफ्रिकन चॅम्पियन मोरोक्कोनं पाच वेळच्या जगज्जेत्या ब्राझीलला १-१ अशा बरोबरीत रोखलं. न्यू यॉर्क न्यू जर्सीच्या प्रसिद्ध ‘मेटलाईफ स्टेडियमवर’ हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सामना पार पडला.
ब्राझीलच्या संघाला मोरोक्कोच्या आक्रमक बचावानं सुरुवातीपासूनच चकित केलं. सामन्याच्या २१ व्या मिनिटाला मोरोक्कोच्या इस्माएल सायबारीनं (Ismael Saibari) एक अप्रतिम आणि चकवणारा गोल डागून संघाला १-० अशी अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. या धक्क्यानंतर ब्राझीलनं आक्रमक पावित्रा घेतला आणि सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला स्टार फॉरवर्ड विनिसीयस जुनियरनं (Vinícius Júnior) मोरोक्कोच्या बचावातील चुकीचा फायदा उठवत शानदार गोल केला आणि ब्राझीलला १-१ अशा बरोबरीवर आणलं.
उत्तरार्धात दोन्ही संघांना विजयी गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. विशेषतः सामन्याच्या अखेरच्या मिनिटांत (Stoppage Time) मोरोक्कोच्या अयुब अमाइमौनीनं मारलेला गोलचा उत्कृष्ट फटका ब्राझीलचा गोलरक्षक अॅलिसन बेकरनं (Alisson Becker) अप्रतिम डबल-सेव्ह करत रोखला आणि ब्राझीलचा संभाव्य पराभव टाळला.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
या बरोबरीमुळे विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपराजेय राहण्याचा ब्राझीलचा १९३४ पासूनचा शानदार रेकॉर्ड कायम राहिला आहे. तर या दोन्ही देशांचा फिफा विश्वचकातील सामन्याचा विचार केला तर तब्बल २८ वर्षापुर्वी झाला होता म्हणजेच १९९८ मध्ये. त्यावेळी ब्राझीलनं ३-० अशा एकतर्फी फरकानं मोरोक्कोचा पराभव केला होता. तसेच एकूण आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासाचा विचार केल्यास, दोन्ही संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या एकूण ४ सामन्यांपैकी ब्राझीलनं २ सामने जिंकले आहेत, तर मोरोक्कोने १ सामना जिंकला असून उर्वरित १ सामना काल अनिर्णित (ड्रॉ) राहिला आहे.
या सामन्यातील १-१ अशा बरोबरीनंतर दोन्ही संघांना ग्रुप ‘सी’ च्या गुणतालिकेत प्रत्येकी १-१ गुण मिळाला आहे. आता ब्राझीलचा या ग्रुपमधील पुढील सामना १९ जून २०२६ रोजी हैतीविरुद्ध खेळवला जाईल, तर मोरोक्कोचा संघ त्याच दिवशी स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल.

