French Open 2026: पॅरिसमधील ऐतिहासिक ‘कोर्ट फिलिप-शॅटरियर’ मैदानावर सुरू आहे. या प्रतिष्ठित फ्रेंच ओपन 2026 (Roland Garros) ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत क्रीडा जगताला थक्क करणारा एक सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. गुरुवार (28 मे) झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या (Round 2) लढतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या इटलीच्या जॅनिक सिनरचा (Jannik Sinner) पराभव झाला आहे. अर्जेंटिनाच्या 56 व्या मानांकित जुआन मॅन्युएल सेरुंडोलो (Juan Manuel Cerundolo) यानं सिनरचा पराभव करत त्याला स्पर्धेतून बाहेर काढलं आहे.
दोन सेट जिंकूनही विजयाच्या उंबरठ्यावरून असा झाला पराभव
तब्बल 3 तास 36 मिनिटे चाललेल्या या थरारक सामन्यात जुआन मॅन्युएल सेरुंडोलोनं सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात करत ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला जॅनिक सिनरनं अपेक्षेप्रमाणे जोरदार खेळ करत पहिले दोन्ही सेट 6-3, 6-2 असे सहज जिंकले होते. तिसऱ्या सेटमध्येही सिनर 5-1 अशा भक्कम आघाडीवर होता आणि तो विजयापासून अवघा एक गेम दूर होता. मात्र, येथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. पॅरिसमधील अतिउष्ण हवामान (33 अंश सेल्सिअस) आणि स्नायूंच्या तीव्र वेदनांमुळे (Cramps) सिनरची प्रकृती अचानक बिघडली. त्याला मैदानातच चक्कर येऊ लागल्यानं त्यानं ‘मेडिकल टाईमआऊट’ घेतला. या शारीरिक समस्येमुळे सिनरची सर्व्हिसची गती कमालीची मंदावली. याचा अचूक फायदा उठवत सेरुंडोलोनं सलग गेम जिंकून तिसरा सेट 7-5 ने खिशात घातला. त्यानंतर थकलेल्या सिनरला कोणतीही संधी न देता पुढील दोन्ही सेट 6-1, 6-1 अशा एकतर्फी फरकानं जिंकून सेरुंडोलोनं विजय साकारला.
या धक्कादायक पराभवामुळे जॅनिक सिनरची कारकिर्दीतील सलग 30 सामने जिंकण्याची ऐतिहासिक विजयी मालिका (Winning Streak) संपुष्टात आली आहे. तो गेल्या अनेक महिन्यांपासून अपराजित होता. तसेच, 2000 सालापासून फ्रेंच ओपनच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पराभूत होणारा तो पहिलाच अव्वल मानांकित (World No. 1) पुरुष खेळाडू ठरला आहे.
सामन्यानंतर भावुक होत सिनर म्हणाला, “आज सकाळी उठल्यापासूनच मला अस्वस्थ वाटत होते. सुरुवातीला खेळ चांगला झाला, पण अचानक शरीरातील ऊर्जा पूर्णपणे संपली. मी रोबोट नाही, खेळाच्या मैदानात कधीकधी अशा गोष्टी घडतात.” या पराभवामुळे सिनरचे ‘करिअर ग्रँड स्लॅम’ पूर्ण करण्याचे स्वप्न यंदा अपूर्ण राहिलं आहे.

