Jannik Sinner: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या इटलीच्या जॅनिक सिनरनं (Jannik Sinner) आपल्या मायदेशात सुरू असलेल्या ‘इटालियन ओपन 2026’ (रोम मास्टर्स) टेनिस स्पर्धेत सुवर्णअक्षरांनी इतिहास रचला आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात (Final) रविवारी, 17 मे 2026 रोजी शानदार विजय मिळवत त्यानं विजेतेपदावर नाव कोरलं आहे. या ऐतिहासिक जेतेपदासह सिनरनं टेनिस जगतातील दिग्गज नोव्हाक जोकोविचचा एक अभूतपूर्व विक्रम मोडीत काढला आहे.
रोममधील लाल मातीच्या (Red Clay) कोर्टवर खेळवल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित जॅनिक सिनरनं नॉर्वेच्या कॅस्पर रुड (Casper Ruud) याचा 1 तास 44 मिनिटांच्या लढतीत 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. सामन्याच्या सुरुवातीला रुडनं 2-0 अशी आघाडी घेत सिनरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सिनरनं आपल्या आक्रमक बेसलाईन शॉट्स आणि अचूक सर्व्हिसच्या जोरावर सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि पहिला सेट 6-4 नं जिंकला. दुसऱ्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये सिनरनं रुडची सर्व्हिस ब्रेक केली आणि संपूर्ण सामन्यात आपली आघाडी कायम ठेवत शानदार विजय निश्चित केला.
जोकोविचचा महाविक्रम मोडीत, 34 सामने जिंकण्याचा नवा रेकॉर्ड
या दिमाखदार जेतेपदासह जॅनिक सिनरचा एटीपी (ATP) मास्टर्स 1000 स्पर्धांमधील विजयी रथ आता सलग 34 सामन्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी त्यानं उपांत्यपूर्व फेरीत आंद्रे रुबलेव्हला हरवून नोव्हाक जोकोविचचा सलग 31 मास्टर्स सामने जिंकण्याचा (2011 मधील) विक्रम मोडीत काढला होता, जो त्यानं जेतेपदासह 34 सामन्यांपर्यंत वाढवला आहे. यासोबतच, टेनिसच्या इतिहासात सर्व 9 मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकणारा (करिअर गोल्डन मास्टर्स) तो नोव्हाक जोकोविच नंतरचा जगातील अवघा दुसरा खेळाडू ठरला आहे.
50 वर्षांची प्रतीक्षा संपली
या विजयामुळे सिनरनं इटालियन चाहत्यांची 50 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. यापूर्वी 1976 मध्ये एड्रियानो पनाटा यानं इटालियन ओपनचं पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं होतं, त्यानंतर हा मान मिळवणारा सिनर पहिलाच इटालियन खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक जेतेपदानंतर आता सिनर आजपासून (18 मे 2026) सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन (Roland Garros) ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.

