म्युनिच (जर्मनी): जर्मनीतील म्युनिच येथे सुरू असलेल्या ‘एटीपी 500 बीएमडब्ल्यू ओपन’ (ATP 500 BMW Open) स्पर्धेत भारताच्या युकी भांब्री (yuki bhambri) आणि न्यझीलंडचा मायकल व्हीनस (michael venus) या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काल (शुक्रवारी, 17 एप्रिल) झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्थानिक जोडी जेकोब श्नाइटर (Jakob Schnaitter) आणि मार्क वॉलनेर (Mark Wallner) यांनी भांब्री-व्हीनस (भारतीय-किवी) जोडीचा पराभव केला.
म्युनिचमधील क्ले कोर्टवर रंगलेल्या या सामन्यात जर्मनीच्या श्नाइटर आणि वॉलनेर जोडीनं सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलं. त्यांनी युकी आणि मायकलचा 6-1, 7-5 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये जर्मन जोडीनं एकतर्फी खेळ करत 6-1 अशी सहज बाजी मारली. तर दुसऱ्या सेटमध्ये भांब्री आणि व्हीनस यांनी जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि सामना 5-5 अशा अटीतटीच्या स्थितीत नेला होता. मात्र, मोक्याच्या क्षणी आपली सर्व्हिस गमावल्यामुळे त्यांना हा सेट 7-5 ने आणि पर्यायानं सामना गमवावा लागला.
ही स्पर्धा 13 एप्रिल ते 19 एप्रिल 2026 दरम्यान जर्मनीतील ‘एमटीटीसी इफिटोस’ (MTTC Iphitos) येथे खेळवली जाणार आहे. जरी या जोडीचा पराभव झाला असला, तरी त्यांचा या स्पर्धेतील प्रवास कौतुकास्पद राहिला. त्यांनी पहिल्या फेरीत अव्वल मानांकित केविन क्रॅविट्झ आणि टिम पुट्झ यांसारख्या दिग्गज जोडीला पराभूत करून मोठा उलटफेर केला होता. या कामगिरीमुळे युकी भांब्रीच्या जागतिक दुहेरी क्रमवारीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे.
बीएमडब्ल्यू ओपनमधील प्रवास संपल्यानंतर आता युकी भांब्री आणि मायकल व्हीनस ही जोडी आगामी (22 एप्रिलपासून) माद्रिद मास्टर्स (Madrid Open) स्पर्धेत ही जोडी सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे मुख्य लक्ष्य मे महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ओपन 2026 मध्ये थेट प्रवेश मिळवून मोठी कामगिरी करण्याचं आहे. भारतीय आणि किवी चाहत्यांना आशा आहे की, पुढील स्पर्धेत नक्कीच हे दोघ विजय मिळवतील.

