मोनॅको: टेनिस विश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि खडतर मानली जाणारी ‘मॉन्टे कार्लो मास्टर्स 2026’ ही स्पर्धा रविवारी एका अत्यंत चुरशीच्या लढतीनं संपन्न झाली. 5 एप्रिलपासून मोनॅकोमधील ‘मॉन्टे कार्लो कंट्री क्लब’च्या लाल मातीवर (Clay Court) रंगलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीच्या जॅनिक सिन्नरनं स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील पहिलं मॉन्टे कार्लो जेतेपद पटकावलं. जगभरातील टेनिस चाहत्यांचं लक्ष लागून राहिलेल्या या महामुकाबल्यात सिनरनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत अल्काराजला 7-6 (5), 6-3 अशा सरळ सेटमध्ये धूळ चारली आणि पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली.
पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना तोडीस तोड टक्कर दिली. अल्काराजनं आपल्या चपळ हालचालींनी सिनरला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र संयमी खेळ करत सिनरनं हा सेट टायब्रेकरमध्ये 7-5 असा आपल्या नावे केला. पहिल्या सेटमधील विजयानं मिळालेला आत्मविश्वास दुसऱ्या सेटमध्ये सिनरच्या खेळात स्पष्टपणे दिसून आला.
त्यानं अल्काराजची सर्व्हिस भेदत सामन्यावर आपली पकड घट्ट केली आणि 6-3 ने विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
या विजयामुळे जॅनिक सिनरनं एक दुर्मिळ विक्रमही आपल्या नावे केला आहे; तो आता सलग चार ‘एटीपी मास्टर्स 1000’ स्पर्धा (पॅरिस 2025, इंडियन वेल्स 2026, मियामी 2026 आणि मॉन्टे कार्लो 2026) जिंकणारा नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदालनंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
जॅनिक सिनरच्या कारकिर्दीचा विचार करता, त्यानं याआधी 2024 आणि 2025 ची ऑस्ट्रेलियन ओपन, 2024 ची यूएस ओपन आणि 2025 चे विम्बल्डन अशी चार ग्रँड स्लॅम जेतेपदं मिळवली आहेत. विशेष म्हणजे, क्ले कोर्टवर सिनरनं मिळवलेलं हे पहिलंच मोठे मास्टर्स 1000 जेतेपद आहे. या विजयामुळे त्यानं कार्लोस अल्काराजला अंतिम फेरीच्या सामन्यांत पराभूत करण्याची आपली वैयक्तिक आकडेवारी 3-0 अशी केली आहे.
यापूर्वी त्यानं 2022 मध्ये उमाग आणि 2025 मध्ये एटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीतही अल्काराजला पराभूत केलं होतं. जरी एकूण आमनेसामने लढतीत अल्काराज अजूनही 10-7 ने आघाडीवर असला, तरी महत्त्वाच्या अंतिम सामन्यांत सिनरनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता सिनरची नजर आगामी ‘फ्रेंच ओपन’च्या जेतेपदावर असणार आहे.

