Miami Open 2026: जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या जॅनिक सिनर (Jannik Sinner) यानं मियामी ओपन 2026 च्या उपांत्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) याचा पराभव केला आहे. आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयासह तो एकाच वर्षात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन जिंकून ऐतिहासिक ‘सनशाईन डबल’ (Sunshine Double) पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
शुक्रवारी (27 मार्च) झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत सिनरनं तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हवर सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. या विजयामुळे सिनरनं चौथ्यांदा मियामी ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून तो आपल्या कारकिर्दीतील 26 वे एटीपी विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.
कसा मिळाला विजय?
मियामी गार्डन्समधील हार्ड रॉक स्टेडियमवर (Hard Rock Stadium) पार पडलेल्या पहिल्या सेटमध्ये सिनरनं 3-1 अशी आघाडी घेत झ्वेरेव्हवर दबाव टाकला आणि 42 मिनिटांत 6-3 ने सेट खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत झाली, ज्यामुळे सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये सिनरनं संयम राखत 7-4 नं बाजी मारली. शेवटी सिनरनं हा सामना 6-3, 7-6 (7-4) असा सरळ सेटमध्ये जिंकला. हा चुरशीचा सामना 1 तास 53 मिनिटे चालला होता.
आमने-सामने विक्रम (Head-to-head)
अलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्ध सिनरचा रेकॉर्ड आता 8-4 असा झाला आहे. विशेष म्हणजे, 2024 सालापासून सिनरनं झ्वेरेव्हविरुद्ध सलग 7 सामने जिंकले असून या काळात त्यानं सलग 10 सेट आपल्या नावे केले आहेत.
फेडररच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी
जर सिनरनं अंतिम सामन्यात विजय मिळवला, तर 2017 मध्ये रॉजर फेडररनं केलेल्या पराक्रमानंतर एकाच वर्षात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन अशा दोन्ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरेल. तसेच, सिनरनं एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांमध्ये सलग 32 सेट जिंकण्याचा नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.
पुढचा अंतिम सामना
सिनरचा अंतिम सामना चेक प्रजासत्ताकच्या 21 व्या मानांकित जिरी लेहेका (Jiri Lehecka) विरुद्ध होईल. हा पुरुष एकेरीचा अंतिम सामना 30 मार्च 2026 रोजी खेळवला जाईल.

