Miami Open 2026: जगातील अव्वल क्रमांकाची टेनिसपटू आर्यना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिनं मियामी ओपन 2026 चे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला आहे. शनिवारी( 28 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या कोको गॉफ (Coco Gauff) हिचा पराभव केला. या विजयासह तिनं ‘सनशाईन डबल’ (एकाच वर्षात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन दोन्ही जिंकणे) पूर्ण केलं आहे.
Aryna Sabalenka: टेनिस विश्वात सध्या आर्यना सबालेन्काचा दबदबा पाहायला मिळत आहे. मियामी ओपनच्या अंतिम लढतीत सबालेन्कानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या कोको गॉफचा पराभव करून सलग दुसरे ‘WTA 1000’ (Women’s Tennis Association 1000) जेतेपद पटकावलं. या विजयामुळे सबालेन्काचा या वर्षातील रेकॉर्ड आता 23-1 असा झाला असून, तिनं जागतिक क्रमवारीत आपलं पहिलं स्थान अधिक मजबूत केलं आहे.
कसा मिळाला विजय?
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात सबालेन्काने गॉफवर 6-2, 4-6, 6-3 असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. सबालेन्कानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गॉफची सर्व्हिस दोनदा ब्रेक केली आणि 6-2 नं पहिला सेट खिशात घातला.
दुसरा सेटमध्ये गॉफनं जोरदार पुनरागमन केलं आणि सबालेन्काची सर्व्हिस ब्रेक करून 6-4 ने सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली.
शेवटच्या निर्णायक तिसरा सेटच्या पहिल्याच गेममध्ये सबालेन्कानं गॉफची सर्व्हिस ब्रेक करून आघाडी घेतली आणि 6-3 ने विजय निश्चित केला. हा सामना 3 तास 11 मिनिटे चालला.
आमने-सामने विक्रम (Head-to-head)
या विजयामुळे सबालेन्कानं कोको गॉफविरुद्धच्या आपल्या वैयक्तिक विक्रमात सुधारणा केली असून, ती आता गॉफविरुद्ध 7-6 ने आघाडीवर आहे. यापूर्वी 2025 च्या फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये गॉफनं सबालेन्काचा पराभव केला होता, ज्याचा बदला तिनं या सामन्यात घेतला.
‘सनशाईन डबल’चा ऐतिहासिक पराक्रम
एकाच कॅलेंडर वर्षात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन या दोन्ही स्पर्धा जिंकणाऱ्या महिलांना ‘सनशाईन डबल’ विजेती म्हटलं जातं. सबालेन्का ही कामगिरी करणारी
जगातील पाचवी महिला ठरली आहे. यापूर्वी
१. स्टेफी ग्राफ (1994, 1996)
२. किम क्लिजस्टर्स (2005)
३. व्हिक्टोरिया अझारेन्का (2016)
४. इगा स्वियातेक (2022)
५. आर्यना सबालेन्का (2026)
मागील कामगिरी
सबालेन्कानं या स्पर्धेपूर्वी याच महिन्यात (मार्च) इंडियन वेल्सची फायनल जिंकली होती. तिनं 2026 मध्ये आतापर्यंत तीन डब्लूटीए (WTA) पदके पटकावली आहेत. सबालेन्का आता ही फॉर्मची लय क्ले-कोर्ट हंगामातही कायम राखण्यासाठी सज्ज आहे

