Miami Open 2026: मियामी ओपन 2026 च्या टेनिस स्पर्धेत भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत (Round of 32) भारताचा अनुभवी खेळाडू युकी भांब्री (Yuki Bhambri) आणि मायकल व्हीनस (michael venus) या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात इंडो-किवी (india-new zealand) जोडीनं शेवटपर्यंत लढा दिला, मात्र सुपर टायब्रेकमध्ये त्यांना नशिबानं साथ दिली नाही.
कोणाविरुद्ध पराभव?
युकी आणि व्हीनस या जोडीचा पराभव ऑस्ट्रेलियाचा जॉन-पॅट्रिक स्मिथ (John-Patrick Smith) आणि नेदरलँड्सचा (Dutch) सँडर एरेंड्स (Sander Arends) या जोडीनं केला. या सामन्यात त्यांचा (युकी-व्हीनस) 4-6, 7-5, 15-13 अशा फरकानं पराभव केला आणि हा सामना 1 तास 52 मिनिटांच्या आसपास चालला.
युकी-व्हीनसनं सामन्याची सुरुवात जोरदार केली होती. त्यांनी पहिला सेट 6-4 असा जिंकून वर्चस्व राखलं होतं. दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही जोड्यांमध्ये बरोबरीची लढत झाली, पण अखेरच्या क्षणी 12 व्या गेममध्ये सर्व्हिस गमावल्यामुळे त्यांना हा सेट 5-7 ने गमवावा लागला.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये (सुपर टायब्रेक) दोन्ही संघांनी जिद्दीनं खेळ केला. युकी आणि व्हीनस एका वेळी 8-6 अशा आघाडीवर होते, मात्र स्मिथ आणि एरेंड्सनं जोरदार पुनरागमन करत स्कोर 9-9 अशी बरोबरीवर आणली. अखेर 13-13 अशा अटीतटीच्या स्थितीत प्रतिस्पर्धी जोडीनं सलग दोन गुण घेत 15-13 ने सामना आणि सेट खिशात घातला. त्यामुळे युकी आणि त्याच्या साथीदाराला पराभवाचा सामना करावा लागला.
युकीची मागील कामगिरी
युकी भांब्रीसाठी हा पराभव धक्कादायक आहे, कारण याच महिन्याच्या सुरुवातीला त्यानं आंद्रे गोरानसनसह इंडियन वेल्सच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण तिथेही त्याचा पराभव झाला. तसेच, युकी आणि व्हीनसने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनच्या (US Open) उपांत्य फेरीत प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले होते.

