एमएमए मध्ये लढत जिंकणारे पहिले भारतीय संग्राम सिंग कोण आहेत?

Sangram Singh MMA: भारतीय कुस्तीचं नाव जागतिक स्तरावर नेणारे संग्राम सिंग यांनी मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखत अर्जेंटिनामध्ये इतिहास रचला आहे. रविवारी (5 एप्रिल 2026) अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथील ‘टिग्रे स्पोर्ट्स क्लब’ स्टेडियमवर हा सामना पार पडला. या झालेल्या अटीतटीच्या लढतीत संग्राम सिंग यांनी फ्रान्सच्या फ्लोरियन कॉडियर (Florian Coudier) याला फक्त 1 मिनिट 45 सेकंदात धूळ चारली. या विजयासह अर्जेंटिनाच्या भूमीवर एमएमए लढत जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत. 40 वर्षांहून अधिक वय असूनही संग्राम यांनी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या फ्लोरिअनला आपल्या अनुभवाच्या जोरावर अवघ्या काही सेकंदात शरण येण्यास भाग पाडले.

संग्राम सिंग यांच्या एमएमए कारकिर्दीतील हा सलग तिसरा विजय असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. यापूर्वी त्यांनी जॉर्जिया आणि नेदरलँड्समध्ये झालेल्या लढतींमध्येही बाजी मारली होती. आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या तिन्ही व्यावसायिक एमएमए सामन्यांत विजय मिळवून आपलं अपराजित राहण्याचं रेकॉर्ड कायम ठेवलं आहे. या लढतीत त्यांनी आपल्या प्रदीर्घ कुस्ती अनुभवाचा वापर करत ‘लेग अटॅक’ आणि ‘चोकहोल्ड’ यांसारख्या तंत्रांनी प्रतिस्पर्ध्याला चितपट केलं. कुस्तीमधून एमएमए मध्ये वळल्यानंतर अशा प्रकारे सलग विजय मिळवणारे ते पहिले भारतीय हेवीवेट फायटर ठरले आहेत.

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील मदिना या छोट्या गावात जन्मलेल्या संग्राम सिंग यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. लहानपणी ‘रुमॅटॉइड अर्थरायटिस’ (संधिवात) मुळे आठ वर्षे व्हीलचेअरवर घालवणाऱ्या या खेळाडूनं फक्त जिद्दीच्या जोरावर आजारावर मात केली आणि जागतिक स्तरावर कुस्तीत नाव कमावलं. ते दोन वेळा कॉमनवेल्थ हेवीवेट चॅम्पियन राहिले असून 2012 मध्ये त्यांना जगातील सर्वोत्तम व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून गौरवण्यात आलं होतं. खेळासोबतच ते एक यशस्वी अभिनेता आणि प्रेरणादायी वक्ते म्हणूनही ओळखले जातात.

अर्जेंटिनातील या विजयानंतर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, खेळासाठी किंवा स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं आणि भारतीयांमध्ये जगातील कोणत्याही खेळावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.