Thailand open 2026: थायलंडची राजधानी बँकॉक येथील निमिबुत्र स्टेडियमवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित टायोटा थायलंड ओपन 2026 (BWF सुपर 500) बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतासाठी संमिश्र यश देणारा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल मानांकित जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत (Semifinals) धडक मारली आहे. मात्र, दुसरीकडे महिला एकेरीमध्ये माजी जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूला कमालीच्या चुरशीनंतर उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सात्विक-चिरागची विजयी घोडदौड
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिराग जोडीनं जपानच्या सहाव्या मानांकित ताकुमी नोमुरा आणि युइची शिजोगामी जोडीचा अवघ्या 41 मिनिटांत 21-12, 21-13 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय जोडीनं 10-0 अशी प्रचंड आघाडी घेत जपानी जोडीला बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या गेममध्ये जपाननं थोडा प्रतिकार केला, पण सात्विकच्या वेगवान स्मॅशेस आणि चिरागच्या उत्कृष्ट नेट प्लेसमोर त्यांचं काही चाललं नाही. हा सामना जिंकून भारताच्या जोडीनं सेमीफायनलला धडक मारली आहे.
पी. व्ही. सिंधूची कडवी झुंज अपयशी
महिला एकेरीत भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूला जपानच्या तिसऱ्या मानांकित आणि विद्यमान जागतिक विजेती अकाने यामागुचीकडून 21-19, 18-21, 15-21 असा 61 मिनिटांच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. सिंधूनं पहिला गेम जिंकून आणि दुसऱ्या गेममध्ये 4 गुणांची आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, यामागुचीनं आपल्या ट्रेडमार्क शैलीत जोरदार पुनरागमन करत सलग दोन गेम जिंकून सिंधूचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणलं.

