मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन: मलेशियातील क्वालालंपूर येथील अॅक्सियाटा अरेना (Axiata Arena) मैदानावर आज 19 मे 2026 पासून प्रतिष्ठित ‘पेरोडुआ मलेशिया मास्टर्स 2026’ (BWF सुपर 500) बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या पात्रता फेऱ्या (Qualifiers) आणि पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताला संमिश्र यश मिळाले.
भारताची राष्ट्रीय खेळाडू आकर्शी कश्यपला महिला एकेरीच्या पात्रता फेरीत दक्षिण कोरियाच्या पार्क गा-एन (Park Ga-eun) कडून 15-21, 22-20, 7-21 असा पराभवाचा धक्का बसला. आकर्शीनं दुसरा गेम अटीतटीनं जिंकून सामन्यात पुनरागमन केलं होतं, मात्र निर्णायक तिसऱ्या गेममध्ये ती पूर्णपणे निष्प्रभ ठरली. तर मिश्र दुहेरीत एस. रेड्डी आणि राधिका यांनी मलेशियाच्या खेळाडूंना पात्रता फेरी पराभूत केलं.
भारताचे पहिल्या दिवशीचे विजयी खेळाडू?
पात्रता फेरीत भारताच्या अश्मिता चालिहानं मात्र चमकदार कामगिरी केली. तिनं चायनीज तैपेईच्या बलाढ्य पाय यु-पो (Pai Yu-po) हिचा 1 तास 4 मिनिटे चाललेल्या थरारक सामन्यात 21-18, 16-21, 21-16 असा पराभव करत मुख्य फेरीत (Main Draw) धडक मारली आहे. तर महिला दुहेरी अश्विनी भट्ट आणि शिखा गौतम या जोडीनं 15-21, 21-17, 17-21 असा कॅनडाच्या सी. लाई आणि जे. देन्त (C. Lai J. Dent) या जोडीचा पराभव केला.
तसेच पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत (Round of 32) भारताच्या एम. आर. अर्जुन आणि हरीहरन अमशकारुणन जोडीनं फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्ह आणि तोमा जुनियर पोपोव्ह या 7 व्या मानांकित जोडीचा 21-19, 21-15 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे मुख्य सामने उद्या बुधवार, 20 मे 2026 रोजी खेळवले जाणार असून, भारताचे स्टार खेळाडू फ्रान्स आणि आशियाई देशांच्या कठीण आव्हानाचा सामना करण्यासाठी कोर्टवर उतरतील. भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन याचा पुरुष एकेरीतील पहिल्या फेरीचा सामना उद्या इंडोनेशियाच्या उदयोन्मुख झाकी उबैदिल्लाह (Zaki Ubaidillah) विरुद्ध होणार आहे. अनुभवी प्रणॉयचा सामना उद्या फ्रान्सच्या आव्हानात्मक ख्रिस्टो पोपोव्ह (Christo Popov) विरुद्ध रंगणार आहे. तर किरण जॉर्जचा सामना फ्रान्सच्या अॅलेक्स लॅनियरशी होईल, तर तरुण मन्नेपल्लीचा मुकाबला तोमा जुनियर पोपोव्हविरुद्ध खेळवला जाईल.

