ग्रँड चेस टूर R. Praggnanandhaa: रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे सुरू सुपर चेस क्लासिक 2026 बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद यानं आपली उत्कृष्ट आणि अपराजित कामगिरी कायम ठेवली आहे. या 9 फेऱ्यांच्या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत आतापर्यंत 5 फेऱ्यांचा खेळ पूर्ण झाला असून प्रज्ञानंद 3 गुणांसह गुणतालिकेत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्यानं आपल्या संयमी आणि आक्रमक खेळीच्या जोरावर जागतिक दर्जाच्या खेळाडूंसमोर भारताचं आव्हान भक्कमपणे टिकवून ठेवलं आहे.
प्रज्ञानंदची या स्पर्धेतील कामगिरी
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रज्ञानंदनं आतापर्यंत खेळलेल्या 5 फेऱ्यांपैकी एका फेरीत दिमाखदार विजय मिळवला असून उर्वरित 4 फेऱ्यांमध्ये त्याने आपले सामने अनिर्णित म्हणजेच ड्रॉ राखले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्यानं फ्रान्सच्या अलिरेझा फिरौजाविरुद्धचा सामना कठीण परिस्थितीतून उत्कृष्ट बचाव करत ड्रॉ केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यानं काळ्या सोंगाट्यांनी खेळताना उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हवर 42 चालींमध्ये मात करून खळबळ उडवून दिली. या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यानं सिंदारोव्हचा क्लासिकल बुद्धिबळातील सलग 53 सामन्यांचा अजिंक्य राहण्याचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढला. या मोठ्या विजयानंतर तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरसोबत, चौथ्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फोरेस्टसोबत, आणि पाचव्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो विरुद्ध अत्यंत अचूक खेळी करत प्रज्ञानंदने आपले सामने ड्रॉ केले.
स्पर्घेत खेळाडू कोणत्या स्थानावर
पाचव्या फेरीअखेर जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर 3.5 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर भारताचा प्रज्ञानंद हा फॅबियानो करूआना, अनिश गिरी आणि जॉर्डन व्हॅन फोरेस्ट यांच्यासोबत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर जेतेपदाच्या चुरशीच्या शर्यतीत कायम आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आता प्रज्ञानंदचा पुढील सहाव्या फेरीचा सामना यजमान रोमानियाच्या बोगदान-डॅनियल डॅक विरुद्ध होणार आहे. स्पर्धेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठण्यासाठी प्रज्ञानंदला या सहाव्या फेरीत विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय बुद्धिबळ चाहत्यांना आशा आहे की, प्रज्ञानंद रोमानियाच्या खेळाडूचा पराभव करून अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे या सामन्याकडे अनेकांचं लक्ष्य लागून आहे.
आणखी हेही वाचा
भारताचे अनेक स्टार खेळाडू मलेशिया मास्टर्समधून बाहेर-https://agcsport.tv/other/many-indian-star-players-pull-out-of-malaysia-masters/

