R Praggnanandhaa: रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथील ‘म्युझियम ऑफ द नॅशनल बँक ऑफ रोमानिया’ येथे खेळवली गेलेली प्रतिष्ठित ग्रँड चेस टूरच्या सुपर चेस क्लासिक 2026 बुद्धिबळ स्पर्धा काल (शनिवारी, 23 मे 2026) संपन्न झाली. भारताचा एकमेव ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद (R. Praggnanandhaa) यानं काल झालेल्या अंतिम म्हणजेच नवव्या फेरीत हॉलंडच्या अनिश गिरीविरुद्धचा सामना सहज ड्रॉ (अनिर्णित) राखला. या अंतिम निकालानंतर प्रज्ञानंद एकूण 4.5 गुणांसह गुणतालिकेत संयुक्तपणे पाचव्या स्थानावर राहिला.
स्पर्धेतील प्रज्ञानंदची कमगिरी
या संपूर्ण 9 फेऱ्यांच्या आव्हानात्मक स्पर्धेत प्रज्ञानंदनं 1 फेरीत दिमाखदार विजय मिळवला, 1 फेरीत पराभव पत्करावा लागला, तर उर्वरित 7 फेऱ्यांमध्ये त्यानं आपले सामने ड्रॉ राखले. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रज्ञानंदनं काळ्या सोंगाट्यांनी खेळताना उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हवर मात करून या स्पर्धेतील आपला एकमेव विजय नोंदवला होता, ज्यामुळे सिंदारोव्हचा सलग 53 सामन्यांचा अपराजित राहण्याचा विक्रम मोडीत निघाला. मात्र, सातव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाकडून झालेल्या पराभवामुळे प्रज्ञानंदचे जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान काहीसे मागे पडले.
कोण ठरला विजेता?
9 फेऱ्यांच्या या साखळी स्पर्धेत जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर 6 गुणांसह अव्वल स्थानावर राहून विजेता ठरला, तर फॅबियानो कारुआनानं दुसरं स्थान पटकावलं. डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या प्रज्ञानंदला यंदा पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं असलं तरी, जगातील दिग्गज खेळाडूंसमोर त्यानं दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली.

