fide candidates 2026: सायप्रसच्या पेगेईया येथील ‘कॅप सेंट जॉर्जेस हॉटेल’मध्ये जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेनं आता अर्ध्या टप्प्याचा टप्पा ओलांडला असून एकूण 7 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या स्पर्धेत पुरुष गटात उझबेकिस्तानचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह यानं आपला दबदबा कायम राखला असून तो 7 पैकी 6 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानं आतापर्यंत पाच मोठे विजय नोंदवून प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर महिला गटात युक्रेनची अण्णा मुझिचुक 4.5 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यामुळे सध्या ती जेतेपदासाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.
भारतीय खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद ठरत असून महिला गटात भारताची स्टार ग्रँडमास्टर आर. वैशाली 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिनं 7 व्या फेरीत चीनच्या माजी जागतिक विजेत्या तान झोंग्यीचा पराभव करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैशालीनं आतापर्यंत दोन महत्त्वाचे विजय नोंदवले असून ती अव्वल स्थानापासून फक्त अर्ध्या गुणानं दूर आहे. दुसरीकडं, पुरुष गटात भारताची मोठी आशा असलेला आर. प्रज्ञानंद 3.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. प्रज्ञानंदनं स्पर्धेची सुरुवात विजयानं केली होती, मात्र त्यानंतरचे त्याचं बहुतांश सामने बरोबरीत सुटल्यानं तो सध्या मध्यम स्थितीत आहे.
युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिनं देखील महिला गटात आपली चमक दाखवली असून ती 3.5 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दिव्यानं 6 व्या फेरीत कझाकस्तानच्या बिबीसारा असाउबायेवाविरुद्ध मिळवलेला विजय हा या स्पर्धेतील सर्वात चर्चेचा विषय ठरला. ही प्रतिष्ठित स्पर्धा एकूण 14 फेऱ्यांची असून, जो खेळाडू यात विजयी ठरेल, तो भारताचा जागतिक चॅम्पियन डी. गुकेश याला जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देईल.
एप्रिल रोजी आठवी फेरी खेळवली जाणार आहे, जिथं भारतीय खेळाडू पुन्हा एकदा आपली सर्वोत्तम चाल रचण्यासाठी सज्ज होतील.

