Asian Boxing Championships 2026: मंगोलियाची राजधानी उलानबातर येथे सुरू असलेल्या आशियाई एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी पार पडलेल्या 48 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीचा (Semi-final) सामना पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात मिनाक्षी हुडानं थायलंडच्या थिप्सत्चा योदवारी (Thipsatcha Yodwaree) हिचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला.
मिनाक्षीन सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत थायलंडच्या खेळाडूवर पंचांचा वर्षाव केला. तिच्या वेगवान पायांच्या हालचाली आणि अचूक ‘जॅब’ समोर योदवारी पूर्णपणे हतबल दिसली. पाचही पंचांनी मिनाक्षीच्या बाजूनं निकाल दिल्यानं तिनं दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे भारताचं स्पर्धेतील पहिलं सुवर्ण किंवा रौप्य पदक आता निश्चित झालं आहे.
ही आशियाई चॅम्पियनशिप 28 मार्च 2026 रोजी मंगोलियात सुरू झाली असून 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मिनाक्षी हुडाचा अंतिम सामना आता 8 किंवा 9 एप्रिल 2026 रोजी पार पडणार आहे. मिनाक्षीनं यापूर्वी जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केली असून, आशियाई स्तरावर सुवर्णपदक जिंकून 2028 ऑलिम्पिकच्या तयारीचा पाया रचण्याचं तिचं मुख्य ध्येय आहे. संपूर्ण भारताचं लक्ष आता या अंतिम लढतींकडं लागलं असून महिला बॉक्सर्सकडून सुवर्णपदक जिंकण्याची आशा दाट वर्तवली जात आहे.
मीनाक्षी व्यतिरिक्त इतर खेळाडूंमध्ये प्रीती पवार 54 किलो गटात पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती दक्षिण कोरियाची बॉक्सर इम एजी हिचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता तिचा सुवर्ण पदकासाठी सामना चिनी तैपेईच्या तीन वेळच्या जागतिक विजेत्या हुआंग ह्सियाओ-वेन हिच्याशी होईल. प्रियानं 60 किलो वजन गटात यजमान मंगोलियाच्या नामून मोनखोरचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. तसेच अरुंधती चौधरी 70 किलो गटात उझबेकिस्तानच्या ओयशा तोइरोव्हावर 4-1 ने मात करून ‘टायटल बाउट’ मध्ये प्रवेश केला, जैस्मिन लम्बोरिया 57 किलो गटात वर्चस्व गाजवत अंतिम फेरी गाठली आहे.
तर दुसरीकडं भारताची अनुभवी बॉक्सर आणि दोन वेळची जागतिक विजेती निखत झरीन हिला (51 किलो) पराभवाचा झटका बसला आहे. निखतला चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या वू यू कडून 5-0 असा पराभव स्वीकारावा लागला.

