Singapore Open badminton: सिंगापूरमधील सिंगापूर इनडोअर स्टेडियमवर आज मंगळवार (26 मे 2026) प्रतिष्ठित कॅपीटल एफएफ (KFF) सिंगापूर ओपन 2026 (BWF सुपर 750) बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली. भारतासाठी स्पर्धेचा पहिला दिवस अत्यंत नाट्यमय आणि संमिश्र यश देणारा ठरला. भारताचे अव्वल मानांकित दिग्गज खेळाडू कोर्टवर चमकले असले, तरी इतर नवोदित खेळाडूंचे आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आले.
सात्विक-चिरागचा थरारक विजय अन् सिंधूची दमदार सलामी
पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील (Round of 32) रोमांचक सामन्यात भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या चेन झी यी आणि प्रेस्ली स्मिथ जोडीवर तब्बल 59 मिनिटांच्या लढतीनंतर 26-28, 21-15, 21-13 असा अटीतटीचा विजय मिळवला. पहिला गेम 26-28 अशा निसटत्या फरकानं गमावल्यानंतर भारतीय जोडीनं जबरदस्त पुनरागमन केलं. त्यांनी आपल्या आक्रमक स्मॅशेसच्या जोरावर पुढील दोन्ही गेम एकतर्फी जिंकून सामना खिशात घातला. तर दुसरीकडे महिला एकेरीमध्ये दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं शानदार खेळ करत इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दनी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला.
पहिल्याच दिवशी भारताला पराभवाचे मोठे धक्के
या दोन मोठ्या विजयांव्यतिरिक्त भारतासाठी आजचा दिवस निराशाजनक राहिला. महिला एकेरीत उन्नती हुडाला जपानच्या तोमोका मियाझाकीकडून 14-21, 10-21 अशी हार मानावी लागली. पुरुष दुहेरीत हरीहरन अमशकारुणन आणि एम. आर. अर्जुन जोडीला जपानच्या होकी-कोबायाशी जोडीनं 15-21, 13-21 असं नमवलं.
महिला दुहेरीमध्ये अश्विनी भट-शिखा गौतम जोडीला चायनीज तैपेईच्या जोडीकडून 16-21, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागला. तर कविप्रिया सेल्वम-सिमरन सिंघी जोडी स्पेनच्या जोडीकडून 21-18, 13-21, 5-21 अशी पराभूत झाली. मिश्र दुहेरीमध्येही रोहन कपूर आणि ऋत्विका गाडे जोडीला चायनीज तैपेईच्या जोडीकडून 18-21, 20-22 असा पराभव सहन करावा लागला. तसेच पुरुष एकेरीत तरुण खेळाडू आयुष शेट्टीला कॅनडाच्या व्हिक्टर लाआयकडून 11-21, 14-21, 12-21 असा पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे भारताने जरी आजच्या दिवसास दोन मोठे विजय मिळवले असले तरीही अनेक भारतीय खेळाडू पहिल्याच फेरीतून बाहेर पडले आहे. पण आता ज्या खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे त्यांच्याकडून भारतीय चाहत्यांनी आशा आहेत की, ते पुढील सर्व सामने जिंकतील आणि सिंगापूर ओपन स्पर्धेवर नाव कोरतील.
पुढील फेरीचे आव्हान
पहिल्या फेरीत विजय मिळवणारे पी. व्ही. सिंधू आणि सात्विक-चिराग हे खेळाडू आता गुरुवार, 28 मे 2026 रोजी आपापले दुसऱ्या फेरीचे (Round of 16) सामने खेळण्यासाठी कोर्टवर उतरतील. तर उद्या बुधवारी लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांच्यासारखे स्टार खेळाडू आपल्या पहिल्या फेरीच्या मोहिमेची सुरुवात करतील.

