Thailand open 2026: थायलंड ओपन 2026 (BWF सुपर 500) बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन याला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथील निमिबुत्र स्टेडियमवर सुरू ही प्रतिष्ठित स्पर्धा पार पडत आहे. शुक्रवार, 15 मे 2026 रोजी खेळवल्या गेलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात यजमान थायलंडच्या अव्वल खेळाडूनं लक्ष्यचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणलं. या पराभवासोबतच भारताचं पुरुष एकेरीतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आलं आहे.
जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनचा सामना थायलंडच्या स्थानिक हिरो आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या कुनलावुत वितिदसर्ण याच्याशी झाला. तब्बल 53 मिनिटे चाललेल्या या उपांत्यपूर्व लढतीत कुनलावुतने लक्ष्यचा 19-21, 16-21 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये कुनलावुतनं सुरुवातीलाच 11-2 अशी प्रचंड आघाडी घेत लक्ष्यवर दबाव निर्माण केला होता. मात्र, लक्ष्यनं नेटजवळ उत्कृष्ट शॉट्स आणि आक्रमक स्मॅशेस मारत अप्रतिम पुनरागमन केलं आणि स्कोअर 19-20 पर्यंत आणला. पण मोक्याच्या क्षणी थायलंडच्या खेळाडूनं गुण घेत पहिला गेम खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये गुण मिळवण्याच्या घाईत लक्ष्यनं अनेक अनपेक्षित चुका केल्या. कुनलावुतच्या उत्कृष्ट बचावात्मक खेळामुळे लक्ष्य वैतागला आणि त्याचे अनेक फटके नेटमध्ये आदळल्यामुळे त्याला हा गेम 16-21 नं गमवावा लागला.
लक्ष्य सेनचे मागील यश
लक्ष्य सेननं यापूर्वी वैयक्तिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत खेळण्यापूर्वी तो भारताच्या थॉमस कप 2026 संघात खेळला होता, जिथं भारतानं कांस्यपदक (Bronze Medal) जिंकलं. वैयक्तिक विजेतेपदाचा विचार करता, लक्ष्यनं 2024 च्या सुरुवातीला प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं होतं.
या स्पर्धेत भारताला एकेरीमध्ये मोठे झटके बसले आहेत. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू देखील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीकडून 21-19, 18-21, 15-21 अशी पराभूत होऊन बाहेर पडली आहे. याशिवाय माजी जागतिक अव्वल मानांकित किदाम्बी श्रीकांत याला दुसऱ्या फेरीत चायनीज तैपेईच्या सु ली यांगकडून पराभवाचा धक्का बसला. युवा खेळाडू देविका सिहाग, मालविका बन्सोड, अनमोल खरब आणि आयुष शेट्टी यांचंही आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे.
आता भारताच्या सर्व आशा फक्त पुरुष दुहेरीतील अव्वल मानांकित सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीवर टिकून आहेत. सात्विक-चिरागनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युइची शिमोगामी जोडीचा 21-12, 21-13 असा पराभव करत उपांत्य फेरीत (Semifinals) दिमाखात प्रवेश केला आहे आणि ते भारताचे एकमेव आव्हान म्हणून स्पर्धेत कायम आहेत.

