सायप्रसमध्ये भारतीय प्रज्ञानंद आणि वैशालीची झेप!

FIDE Candidates 2026: सायप्रस येथे सुरू असलेल्या फिडे कॅन्डिडेट्स 2026 (FIDE Candidates 2026) या अत्यंत प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत जगातील सर्वोत्तम आठ पुरुष आणि आठ महिला बुद्धिबळपटू आमने-सामने आहेत. 4 एप्रिल 2026 पर्यंत या स्पर्धेच्या एकूण 5 फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आज सहावी फेरी खेळवली जात आहे

पुरुष गटात (Open Section) उझबेकिस्तानचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह (Javokhir Sindarov) 5 पैकी 4.5 गुणांसह एकमेव आघाडीवर आहे. त्यानं सलग तीन विजय (हॅट्ट्रिक) नोंदवून सर्वांचं लक्ष वेधलं असून पाचव्या फेरीत त्यानं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या हिकारू नाकामुराचा पराभव केला. अमेरिकेचा फॅबियानो कारुआना 3.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

तर महिला गटात (Women’s Section) पाचव्या फेरीनंतर युक्रेनची अण्णा मुझिचुक आणि कझाकस्तानची बिबीसारा असाउबायेवा प्रत्येकी 3.5 गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. चीनची तान झोंग्यी आणि रशियाची अलेक्झांड्रा गोर्याचकिना पिछाडीवर आहेत.

भारताची या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी
आर. प्रज्ञानंद हा या स्पर्धेत खेळणारा एकमेव भारतीय पुरुष खेळाडू आहे. पाचव्या फेरीअखेर तो 2.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं पाचव्या फेरीत रशियाच्या आंद्रे एसिपेन्कोसोबत बरोबरी साधली.

दुसरीकडं महिला गटात भारताकडून आर. वैशाली आणि दिव्या देशमुख प्रतिनिधित्व करत आहेत. वैशाली सध्या 2 गुणांसह मध्यवर्ती स्थानावर आहे, तर दिव्या देशमुख 1.5 गुणांसह तळाच्या स्थानावर संघर्ष करत आहे.

पुरूष गटातील प्रज्ञानंदचा पुढील सामना अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी होणार आहे. तर महिला गटात आर. वैशालीचा सामना अलेक्झांड्रा गोर्याचकिनाशी, आणि दिव्या देशमुखचा सामना बिबीसारा असाउबायेवाशी होणार आहे.

ही स्पर्धा एकूण 14 फेऱ्यांची असून 15 एप्रिलपर्यंत चालणार आहे. जो खेळाडू या स्पर्धेत विजयी होईल, तो जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या डी. गुकेश (पुरुष) आणि चीनच्या जू वेनजुन (महिला) यांना आव्हान देईल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.