Norve Chess 2026: नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील प्रसिद्ध ‘डीचमन ब्योर्विका’ सार्वजनिक ग्रंथालयात सुरू असलेल्या प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ 2026 (Norway Chess) स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारतासाठी मंगळवारचा दिवस आव्हानात्मक ठरला. पहिल्या फेरीत शानदार विजय मिळवणाऱ्या डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद या दोघांनाही या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, महिला गटामध्ये भारताच्या दिव्या देशमुखनं विजयाची मालिका कायम ठेवली आहे.
गुकेश आणि प्रज्ञानंदचा पराभव
ओपन गटामध्ये काल खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारताच्या आर. प्रज्ञानंदचा सामना फ्रान्सच्या अलिरेझा फिरौजा विरुद्ध झाला. क्लासिकल डावात प्रज्ञानंदनं काही चांगल्या चाली खेळल्या, पण मधल्या टप्प्यात तो भरकटला आणि त्याचा थेट क्लासिकल सामन्यातच पराभव झाला. दुसऱ्या लढतीत, विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेश यानं अमेरिकेच्या वेस्ली सो विरुद्धचा क्लासिकल सामना अवध्या 27 चालींमध्ये ड्रॉ राखला. मात्र, त्यानंतर झालेल्या ‘आर्मागेडॉन’ (Armageddon) टायब्रेकरमध्ये गुकेशनं मोठी चूक केली, ज्याचा फायदा घेत वेस्ली सो यानं विजय मिळवला.
तर दुसरीकडे, महिला गटामध्ये भारताच्या दिव्या देशमुखनं सलग दुसरा विजय मिळवला आहे. ऑल-इंडियन आर्मागेडॉन लढतीत दिव्यानं भारताचीच अव्वल महिला खेळाडू कोनेरू हंपीचा पराभव करून 1.5 गुण पटकावले. या सामन्याचा क्लासिकल डाव बरोबरीत सुटला होता.
स्पर्धेत फ्रान्सच्या अलिरेझा फिरौजानं सलग दुसरा क्लासिकल विजय मिळवून एकूण 6 गुणांसह ओपन गटामध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. दुसऱ्या बाजूला, पहिल्या फेरीत पराभूत झालेल्या स्थानिक हिरो मॅग्नस कार्लसननं जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरविरुद्ध क्लासिकल डाव ड्रॉ झाल्यानंतर आर्मागेडॉनमध्ये विजय मिळवून स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं आहे. महिला गटामध्ये कझाकिस्तानची बिबिसारा अस्सौबायेवा चीनच्या जू जिनरला टायब्रेकरमध्ये हरवून गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे.
आज खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या फेरीत प्रज्ञानंद आणि गुकेश पुनरागमन करण्याच्या निश्चयानं मैदानात उतरतील, तर दिव्या देशमुख आपलं अव्वल स्थान गाठण्यासाठी प्रयत्न करेल.

