निकोशिया (सायप्रस): भारताची ग्रँडमास्टर आर. वैशाली हिनं सायप्रसमध्ये सुरू असलेल्या ‘फिडे महिला कॅन्डिडेट्स 2026’ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून जागतिक बुद्धिबळात इतिहास रचला आहे. बुधवारी, 15 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या शेवटच्या आणि 14 व्या फेरीत वैशालीनं रशियाच्या अनुभवी कॅटरिना लागनो हिचा पराभव करून या प्रतिष्ठित स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आहे. या विजयासह वैशाली आता जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या जू वेनजुन हिला आव्हान देणार आहे आणि या कॅंन्डिडेस स्पर्धेची ती पहिली भारतीय महिला ‘विजेती’ ठरली आहे.
शेवटच्या फेरीत वैशालीला विजेतेपदासाठी विजय अनिवार्य होता. अत्यंत दडपणाखाली खेळताना तिने पांढऱ्या मोहऱ्यांनी सुरुवात केली आणि 38 व्या चालीवर कॅटरिना लागनोने केलेल्या वजीराच्या एका चुकीचा फायदा घेत सामन्यावर पकड मिळवली. अवघ्या 48 चालींमध्ये वैशालीने विजय मिळवून एकूण 8.5 गुणांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. या विजयामुळे तिनं कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवा हिला मागं टाकलं, जी 7.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली.
आर. वैशाली ही कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी 2011 मध्ये कोनेरू हंपीनं जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी मजल मारली होती, पण ती रेटिंगच्या आधारावर पात्र ठरली होती. 15 वर्षांनंतर अशा प्रकारे स्पर्धेतून पात्र ठरणारी वैशाली ही दुसरी भारतीय महिला आहे. विशेष म्हणजे, तिचा भाऊ आर. प्रज्ञानंद यानंही याच स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यामुळे ही जगातील पहिली बहीण-भावाची जोडी ठरली आहे ज्यांनी एकाच वेळी कॅन्डिडेट्समध्ये प्रवेश केला.
पुरुष (Open) विभागात उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्ह यानं 9.5 गुणांसह विजेतेपद पटकावलं. तो आता भारताच्या डी. गुकेश याच्याशी जागतिक अजिंक्यपदासाठी लढेल. भारताच्या आर. प्रज्ञानंदनं शेवटची फेरी बरोबरीत सोडवली आणि तो 5 गुणांसह सातव्या स्थानावर राहिला. महिला गटात भारताची दुसरी खेळाडू दिव्या देशमुख हिनं शेवटच्या फेरीत विजय मिळवला असला, तरी तिलाही 5 गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
या विजयामुळे वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन भारतीय खेळाडू (डी. गुकेश आणि आर. वैशाली) आपापल्या गटात जेतेपदासाठी लढताना दिसतील, जे भारतीय बुद्धिबळासाठी सुवर्णयुग मानलं जात आहे.

