FIDE Candidates 2026: सायप्रस येथे सुरू असलेल्या फिडे कॅन्डिडेड्स बुद्धिबळ स्पर्धा 2026 (FIDE Candidates 2026) मध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे. 10 फेऱ्या (Rounds) पूर्ण झाल्या असून, भारताची स्टार खेळाडू आर. वैशाली (R. vaishali) हिनं महिला विभागात सुवर्ण संधी निर्माण केली आहे, तर पुरुष विभागात प्रज्ञानंदचं आव्हान काहीसं डळमळीत झालं आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेनं आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला असून 14 पैकी 10 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. 10 व्या फेरीनंतर भारतीय संघातून आनंदाच्या आणि निराशेच्या दोन्ही बातम्या समोर आल्या आहेत.
फिडे कॅन्डिडेड्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला विभागामध्ये भारताची आर. वैशाली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून 10 फेऱ्यांच्या अखेरीस ती 6 गुणांसह गुणतालिकेत एकल आघाडीवर (Sole Lead) पोहोचली आहे. 10 व्या फेरीत तिनं युक्रेनच्या अण्णा मुझिचूकविरुद्ध संयमी खेळ करत बरोबरी साधली. विशेष म्हणजे, याच फेरीत तिची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या चीनच्या खेळाडूचा पराभव झाल्यानं वैशालीला पहिल्या स्थानावर कब्जा मिळवण्याची सुवर्णसंधी मिळाली. आता उर्वरित 4 फेऱ्यांमध्ये वैशालीनं आपली हीच लय कायम राखल्यास ती जागतिक अजिंक्यपदासाठी आव्हान देणारी पहिली भारतीय महिला ठरू शकते. दुसरीकडं, नागपूरच्या दिव्या देशमुखला (Divya Deshamukh) मात्र 10 व्या फेरीत बलाढ्य अलेक्झांड्रा गोर्याचकिनाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे, ज्यामुळे ती 4.5 गुणांसह सातव्या स्थानावर घसरली आहे.
पुरुष (Open) विभागाबद्दल सांगायचं झालं तर, भारतासाठी 10 वी फेरी धक्कादायक ठरली. जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आर. प्रज्ञानंदला (R. Praggnanandhaa) उझबेकिस्तानच्या जवाोखिर सिंदारोव्हनं पराभवाचा धक्का दिला. सिंदारोव्हनं या स्पर्धेत दुसऱ्यांदा प्रज्ञानंदला मात दिली असून, प्रज्ञानंद सध्या 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या पराभवामुळे प्रज्ञानंदचं जेतेपदाचं स्वप्न आता जवळपास संपुष्टात आलं आहे.
सध्या या विभागात उझबेकिस्तानचा सिंदारोव्ह 8 गुणांसह पहिल्या स्थानावर असून, त्यानं अनिश गिरीवर दोन गुणांची आघाडी घेतली आहे. या स्पर्धेचा विजेता खेळाडू थेट भारताच्याच सध्याच्या जागतिक विजेत्या डी. गुकेश याच्याशी जागतिक अजिंक्यपद सामन्यासाठी भिडणार आहे. आता सर्वांच्या नजरा वैशालीच्या कामगिरीकडं लागल्या असून, ती इतिहास रचणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

