कॅन्डिडेट्स 2026: उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हची ऐतिहासिक झेप!

FIDE Chess Candidates 2026: जगातील अव्वल आठ बुद्धिबळपटूंच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या 19 वर्षीय खेळाडूनं आपला जोर कायम राखला आहे. सायप्रसमध्ये सुरू असलेल्या फिडे कॅन्डिडेट्स 2026 (FIDE Candidates 2026) या अत्यंत मानाच्या बुद्धिबळ स्पर्धेत उझबेकिस्तानचा युवा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह स्पर्धेच्या चौथ्या फेरीनंतर तो 3.5 गुणांसह गुणतालिकेत एकमेव आघाडीवर (Sole Lead) पोहोचला असून, त्यानं दिग्गज खेळाडूंचे आव्हान मागं टाकलं आहे.

नुकत्याच झालेल्या सामन्यात कोणाचा पराभव केला?
बुधवारी (1 एप्रिल) पार पडलेल्या चौथ्या फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात सिंदारोव्हनं जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि अमेरिकेचा दिग्गज फॅबियानो कारुआना (Fabiano Caruana) याचा पराभव केला. फक्त 36 चालींमध्ये त्यानं कारुआनाला नमवून आपली ताकद दाखवून दिली. यापूर्वी तिसऱ्या फेरीत त्यानं भारताच्या आर. प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) याचाही पराभव केला होता.

2025 मधील कामगिरी आणि प्रवास
नोव्हेंबर 2025 मध्ये गोव्यात झालेल्या फिडे विश्वचषक 2025 (FIDE World Cup 2025) स्पर्धेचे जेतेपद सिंदारोव्हने पटकावलं. अंतिम सामन्यात त्यानं चीनच्या ‘वे यी’चा पराभव करून विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा मान मिळवला. याच विजयामुळे त्याला 2026 च्या कॅन्डिडेट्स स्पर्धेचे तिकीट मिळालं होतं.

सिंदारोव्हनं वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवून इतिहास रचला होता. उझबेकिस्तानला 2022 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. ‘जावोखिर’ (Javokhir) या नावाचा उझबेक भाषेत अर्थ ‘रत्न’ (Jewel) असा होतो. आपल्या नावाप्रमाणेच तो उझबेक बुद्धिबळाचे अनमोल रत्न ठरत आहे.

स्पर्धेतील सद्यस्थिती (चौथ्या फेरीनंतर)
1. जावोखिर सिंदारोव्ह (उझबेकिस्तान): 3.5 गुण (प्रथम स्थान)
2. फॅबियानो कारुआना (अमेरिका): 2.5 गुण
3. आर. प्रज्ञानंद (भारत), अनिश गिरी (नेदरलँड्स), मॅथियास ब्लूबाउम (जर्मनी): प्रत्येकी 2 गुण

ही स्पर्धा एकूण 14 फेऱ्यांची असून, याचा विजेता भारताचा विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेश याला जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देईल

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.