Indonesia Open: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील प्रसिद्ध इस्तोरा सेनायन इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित पॉलिट्रॉन इंडोनेशिया ओपन २०२६ (BWF सुपर १०००) बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा प्रवास संपला आहे. काल शुक्रवारी पार पडलेल्या पुरुष दुहेरीच्या चुरशीच्या उपांत्यपूर्व (Quarterfinals) फेरीत भारताच्या एम. आर. अर्जुन आणि हरीहरन अमशकारुणन या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच चालू इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील भारताचं संपूर्ण आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आलं आहे.
३२ मिनिटांत मलेशियन जोडीकडून सरळ गेम्समध्ये पराभव
जागतिक क्रमवारीत ३० व्या स्थानावर असलेल्या अर्जुन-हरीहरन जोडीचा मुकाबला मलेशियाच्या सातव्या मानांकित गोह शे फेई आणि नूर इझुद्दीन या जागतिक क्रमांक ८ जोडीविरुद्ध झाला. अवघ्या ३२ मिनिटे चाललेल्या या एकतर्फी सामन्यात मलेशियन जोडीनं भारतीयांचा १२-२१, १०-२१ असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. पहिल्या गेमच्या सुरुवातीला मलेशियन जोडीनं ११-१० अशी नाममात्र आघाडी घेतली होती, मात्र मध्यंतरानंतर त्यांनी सलग गुण घेत पहिला गेम २१-१२ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीच्या वेगवान आक्रमणासमोर भारतीय जोडी पूर्णपणे निष्प्रभ ठरली आणि त्यांना हा गेम १०-२१ अशा मोठ्या फरकानं गमवावा लागला.
यंदाच्या इंडोनेशिया ओपन २०२६ स्पर्धेत भारताची कामगिरी कमालीची निराशाजनक राहिली. पुरुष दुहेरीतील भारताची स्टार जोडी सात्विक-चिरागनं सात्विकच्या खांद्याच्या दुखापतीमुळे पहिल्याच फेरीत माघार घेतली होती. पुरुष एकेरीमध्ये अनुभवी लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडले. महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीतील युवा खेळाडू आयुष शेट्टी यांचं आव्हान दुसऱ्या फेरीत (Round of 16) ॲन से-यंग आणि ली च्युके यियूकडून पराभूत झाल्यामुळे आधीच संपुष्टात आले होते.

