IPL 2026 CSK vs PBKS: आज (3 एप्रिल) आयपीएल 2026 च्या हंगामातील सातवा सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात हा होणार आहे. हा सामना चेपॉक (MA Chidambaram Stadium) येथे पार पडणार आहे.
गेल्या सामन्यात CSK चा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला. या सामन्यात CSK ची फलंदाजी पूर्णपणे कोलमडलेली दिसली. संघाला मोठी भागीदारीही उभारता आली नाही. टॉप ऑर्डर लवकर बाद झाल्यानं मधल्या फळीवर दबाव आला, मात्र तेही अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत आणि अखेर त्यांना फक्त 127 धावांवर मजल मारता आली. गोलंदाजांकडूनही फारसा प्रतिकार दिसला नाही. परिणामी राजस्थाननं हे लक्ष्य सहज पार करत CSK ला मोठा पराभव दिला. या सामन्यानंतर CSK च्या बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
तर दुसरीकडं Punjab Kings नं आपल्या शेवटच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला होता. या सामन्यात पंजाबची सुरुवात थोडी खराब झाली होती, कारण सुरुवातीला विकेट्स लवकर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर मधल्या फळीनं जबाबदारी घेत डाव सावरला. विशेषतः कूपर कॉनोली या खेळाडूनं नाबाद (72*) अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या दिशेनं नेलं. शेवटी पंजाब किंग्सनं हा सामना 3 विकेट्सनं जिंकत शानदार विजय मिळवला.
गुणतालिकेत दोन्ही संघ
सध्या सीएसकेचा संघ गुणतालिकेत (Point Table) शेवटच्या स्थानावर आहे. तर ज्या संघानं सीएसकेचा पराभव केला तो राजस्थानचा संघ रन रेटच्या जोरावर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसरीकडं पंजाब किंग्स पहिल्याच सामन्यात गुजरात टाइटन्स विरूद्ध विजय मिळवून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.
आज या दोन्ही (सीएसके विरूद्ध पंजाब) संघात सामना होणार आहे. तसेच हा सामना चेन्नईच्याच घरच्या मैदानावर होणार असल्यामुळे आज सीएसकेचा संघ पुनरागमन करणार का, याकडे सीएसकेच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडं पंजाब किंग्स सीएसकेचा पराभव करून आयपीएल 2026 मधील सलग दुसरा विजय मिळवतील का, याकडे सुद्धा अनेक चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
धोनी आजचा सामना खेळणार का?
आयपीएल 2026 चालू होण्यापुर्वीच सीएसकेनं अधिकृतपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की, धोनी काही आठवडे दुखापतीमुळे खेळणार नाही. पण गेल्या सामन्यात सीएसके संघाची कामगिरी पाहून धोनी प्रॅक्टीस करताना दिसला. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे की, धोनी आजचा सामना खेळू शकतो. पण त्यानं (धोनी) किंवा सीएसकेनं असं कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. पण सीएसकेच्या चाहत्यांना आशा आहे की, धोनी आजचा सामना खेळू शकतो.

