दिल्लीने कुठे गमावला सामना

IPL 2026 GT vs DC: काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 धावेनं पराभव करून या हंगामातील आपला पहिला विजय मिळवला आहे. हा सामना बुधवारी (8 एप्रिल 2026) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. पण शेवटी गुजरातनं हा सामना जिंकलाच.

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. गुजरातनं आपल्या डावाची सुरुवात जोरदार केली आणि निर्धारित 20 षटकांत 4 बाद 210 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. गुजरातच्या या मोठ्या धावसंख्येचा पाया सलामीवीर जोस बटलरनं रचला, ज्यानं फक्त 27 चेंडूंत 52 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलनं 45 चेंडूंत 70 धावांची कर्णधारी खेळी केली, तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरनं 32 चेंडूंत नाबाद 55 धावा जोडून संघाला दोनशेपार नेलं.

211 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात संथ झाली, पण सलामीवीर के. एल. राहुलनं एक बाजू लावून धरली. राहुलनं 52 चेंडूंत 92 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, तो मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानं सामन्याचं पारडं गुजरातच्या बाजूनं झुकलं. पण नंतर डेव्हिड मिलरनं (41* धावा) काही मोठे फटके मारून दिल्लीच्या संघाच्या आणि चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, शेवटच्या दोन चेंडूंवर 2 धावांची गरज असताना मिलरनं धाव घेण्यास नकार दिला आणि शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला, ज्यामुळे दिल्लीला 1 धावेनं हार मानावी लागली.

गुजरातच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो फिरकीपटू राशिद खान. ज्यानं 17 धावांत 3 बळी घेऊन दिल्लीच्या मधल्या फळीचं कंबरडं मोडलं. आणि दिल्लीच्या धावगतीला लगाम लागला. या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं.

या विजयामुळे गुजरात टायटन्सनं गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे, तर दिल्लीचा संघ पराभवानंतर चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. दोन्ही संघांमधील एकूण रेकॉर्ड आता 8 सामन्यांत गुजरातच्या संघानं 5 विजय मिळवले आहे तर दिल्लीनं 3 विजय मिळवले आहेत.एकूणच गुजरातचं पारडं जड आहे असं दिसत आहे. गुजरातचा पुढचा सामना 12 एप्रिलला लखनऊविरूद्ध होणार आहे, तर दिल्लीचा सामना 11 एप्रिलला सीएसकेविरूद्ध होणार आहे.

आणखी हेही वाचा
https://agcsport.tv/ipl-2026/will-gujarat-give-a-winning-start-today/

https://agcsport.tv/cricket/why-did-adam-zampa-choose-psl-over-ipl/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.