IPL 2026 MI vs RR: काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपला सलग तिसरा विजय मिळवला आहे. मंगळवार, 7 एप्रिल 2026 रोजी गुवाहाटी येथील एसीए बारसापारा स्टेडियमवर झालेला हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे उशीरा चालू झाला. पावसामुळे सामन्याला सुमारे दोन तास उशीर झाला, परिणामी पंचांनी दोन्ही संघांसाठी प्रत्येकी 11 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सनं प्रथम गोलंदाजी स्वीकारली, मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत धावांचा पाऊस पाडला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 11 षटकांच्या मर्यादित खेळात 3 बाद 150 धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानच्या या आक्रमक डावाचा मुख्य नायक सलामीवीर यशस्वी जयस्वाल ठरला, ज्यानं फक्त 32 चेंडूंत 77 धावांची झंझावाती खेळी केली. त्याला 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 14 चेंडूंत 39 धावा कुटून मोलाची साथ दिली, ज्यामुळे मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. 151 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय खराब झाली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन स्वस्तात तंबूत परतल्यामुळे मुंबईचा संघ सुरुवातीलाच दबावाखाली आला. मधल्या फळीत नमन धीर आणि शेर्फेन रदरफोर्ड यांनी प्रत्येकी 25 धावा करून एकाकी झुंज दिली, पण राजस्थानच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव 11 षटकांत 9 बाद 123 धावांवर मर्यादित राहिला.
या विजयामुळे राजस्थान रॉयल्सनं 3 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण मिळवून गुणतालिकेत दिमाखात अव्वल (पहिल्या) स्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडं, 3 सामन्यांत दोन पराभव पत्करावा लागलेला मुंबई इंडियन्सचा संघ 2 गुणांसह सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.
राजस्थानसाठी नांद्रे बर्गर, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी घेतले. आतापर्यंतच्या या दोन्ही संघाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यांच्यात आतापर्यंत 33 सामने झाले असून मुंबईनं 16 तर राजस्थानने 15 सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध गुवाहाटीमध्येच होईल, तर मुंबई इंडियन्स 12 एप्रिल रोजी वानखेडेवर आरसीबीशी भिडणार आहे.

